मुंबई: महाराष्ट्राच्या डिजिटल क्रांतीला बळ देण्यासाठी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने (AWS) राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मुंबईमध्ये डेटा सेंटरच्या विस्तारासाठी ८.४ अब्ज डॉलर्सची (सुमारे ७०,००० कोटी रुपये) नवी गुंतवणूक सुरू केली आहे. ही गुंतवणूक आधीच राज्यात कार्यरत असलेल्या ३.७ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका ऑनलाइन कार्यक्रमात या डेटा सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "महाराष्ट्र आज देशातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ॲमेझॉनसोबत 'क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर' क्षेत्रात गुंतवणुकीचा जो करार झाला होता, त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल आणि रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील."
व्यवसाय सुलभतेला चालना..
राज्य सरकारने 'इज ऑफ डूइंग बिझनेस' (व्यवसाय सुलभता) वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. परवानग्यांची प्रक्रिया जलद करण्यासाठी 'इज ऑफ डूइंग बिझनेस वॉर रूम' कार्यरत आहे, ज्यामुळे परदेशी गुंतवणुकीला राज्यात अधिक प्रोत्साहन मिळत आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1970459105832611919
या सोहळ्यात, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतातील पहिल्या 'थिंक बिग मोबाईल व्हॅन'ला हिरवा झेंडा दाखवला. ॲमेझॉनच्या STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) लॅब उपक्रमाचा भाग असलेल्या या व्हॅनमुळे राज्यातील शासकीय शाळांमधील सुमारे ४,००० विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळेल आणि त्यांना नवनवीन संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.