सध्या घरात किती सोनं (Gold) ठेवावं, याला काही मर्यादा नाही; पण त्याचा स्त्रोत किंवा पुरावा देणं बंधनकारक आहे. तर केंद्रीय प्रत्यक्ष टॅक्स मंडळाने (Central Board of Direct Taxes-CBDT) उत्पन्नाचा स्त्रोत न सांगता घरात सोनं ठेवण्याची मर्यादा ही कायद्याने निश्चित केली. त्यानुसार कोणतीही विवाहित महिला आपल्या घरात किंवा आपल्याजवळ 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपर्यंत सोन्याचे दागिने ठेऊ शकते. घरात चार महिला असतील तर त्यांच्याकडील एकूण दागिने गृहित धरता दोन किलो सोनं असू शकते.
अविवाहित महिलेसाठी ही मर्यादा 250 ग्रॅम (250 gm) आहे. पुरुषांसाठी सोनं बाळगण्याची मर्यादा शंभर ग्रॅम (100gm) आहे. यानुसार कोणताही पुरुष शंभर ग्रॅम सोनं बाळगू शकतो. मग तो विवाहित असो किंवा अविवाहित. आणखी एक गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स विभागाच्या तपासणीत या प्रमाणात सोने आढळून आले तर ते जप्त केले जात नाही. पण या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात सोनं सापडलं तर त्याचे स्रोत देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सोन्याशी खरेदीच्या पावत्याही दाखवाव्या लागतील. इन्कम टॅक्स अधिकारी आपल्या तपासणीतून हे सोनं नियमित उत्पन्नातून खरेदी केले आहे की अधिक मालमत्ता आहे, हे निश्चित करतात.
अनेकांना वारशाने सोन्याचे दागिने मिळतात. याशिवाय भेटवस्तूंच्या रुपातूनही सोनं मिळू शकतं. या सोन्याचे किंवा सोन्याच्या भेटवस्तुंचे पुरावे द्यावे लागतात. याशिवाय एखाद्या व्यक्तीला इच्छापत्रातून (Will) सोनं मिळालं असेल तर ते इच्छापत्र (Will) सुरक्षितपणे जतन करणं गरजेचं आहे.
एखादी व्यक्ती सोनं भेट देत असेल तर संबधित व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (Income Tax Return-ITR) त्याची माहिती द्यावी लागेल. गिफ्ट देणार्या व्यक्तीकडून आयटीआरशी निगडीत कागदपत्रं किंवा खरेदीची बिलं मागून घेणं हिताचं ठरू शकतं. तसेच एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या उत्पन्नातून मर्यादेच्या आत सोनं खरेदी केले असेल आणि त्यानंतरही वारशाने काही सोनं मिळाले असेल तर साहजिकच त्याचे प्रमाण अधिक राहील. अशावेळी वारशाने मिळालेल्या सोन्याचे पुरावे द्यावे लागतात.
सोनं खरेदी करताना...
सोन्याची खरेदी प्रमाणापेक्षा अधिक केली जात असेल तर त्यासाठी सोन्याची विक्री करणारे व्यापारी खरेदीदारांकडून पॅनकार्डची (Pan Card) मागणी करू शकतात. याशिवाय संबंधित व्यक्तीच्या नावाने सोनं खरेदी केले जात असेल आणि कार्ड पेमेंट केलं जात असेल तर तो व्यवहार त्याच्याच खात्यातून किंवा कार्डने करणे अपेक्षित असते. म्हणजेच खरेदीदाराचे बिलावरचे नाव, खात्यावरचे नाव, डेबिट/क्रेडिट कार्डवरचे नाव हे एकाच व्यक्तीचे असावे, असा नियम काही व्यापारी पाळतात. काळा पैसा सोन्यामध्ये रूपांतरित होऊ नये, यासाठी अर्थमंत्रालयाने (Finance Ministry, Govt of India) काही नियम निश्चित केले आहेत.
मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम ठेवण्यावर निर्बंध!
सोन्याप्रमाणेच घरात किती रोकड ठेवावी, याची ही कोणती मर्यादा कायद्याने निश्चित केलेली नाही. पण घरात ठेवलेल्या पैशांचा स्रोत सांगणं गरजेचं आहे. यानुसार घरातील रोकड ही काळा पैशाचा भाग नाही, हे सिद्ध करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती एकाचवेळी 50 हजारांपेक्षा अधिक रोकड जमा करत असेल किंवा काढत असेल तर त्याला पॅन क्रमांक द्यावा लागतो. याशिवाय बँकेला रोख रक्कम देऊन पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट तयार करण्यास सांगितले तर तिथेही पॅनकार्ड द्यावे लागते.
20 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम घेणं चुकीचं!
आपण एखाद्या व्यक्तीकडून रोखीने 50 हजार रुपये घेत असाल तर ते चुकीचे ठरू शकते. नियमानुसार आपण 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात स्वीकारू शकत नाही. तसेच आरोग्यावर पाच हजारांपेक्षा अधिक खर्च रोख स्वरूपात केला तर त्यावर टॅक्समध्ये सवलत मिळत नाही. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती परकीय चलन मिळवत असेल तर तो केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच्या मूल्याचे चलन मिळवू किंवा बाळगू शकतो. देणगीसंबंधीच्या नियमानुसार दोन हजारापेक्षा अधिक रोख रुपात देणगी देता येत नाही.
अशाप्रकारे सोन्याच्या खरेदीसोबतच इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) इतर व्यवहारांसाठीही किमान नियम तयार केले आहेत. नियमांच्याअधीन राहून एखादी व्यक्ती कितीही सोनं बाळगू शकते. फक्त त्याला त्याचे स्त्रोत देणं गरजेचं आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            