सध्याच्या घडीला सर्वांनी ठरवून गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे तुम्ही तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवू शकता. तसं पाहायला गेलं तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसं की, एकीकडे शेअर मार्केट आहे आणि दुसरीकडे सरकारी गुंतवणूक योजना आहेत.
शेअर मार्केटमध्ये कमी वेळेत अधिक परतावा मिळतो. पण त्यात तेवढीच रिस्कही आहे. पण त्याचवेळी सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये परतावाही चांगला मिळतो आणि रिस्क पण खूपच कमी असते. सरकारी बचत योजनांबद्दल सांगायचे झाले तर पोस्ट ऑफिसच्या (India Post Office) गुंतवणूक आणि बचत योजना चांगल्या आहेत. आज आपण पोस्टाच्या अशाच काही बचत योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार गुंतवणूक करून भविष्यात एक चांगली रक्कम मिळवू शकता.
पोस्ट ऑफिस मुदत ठेवी (Post Office FD)
पोस्टाच्या मुदत ठेवी योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पोस्टाच्या मुदत ठेवींवर 5.8 टक्के व्याज मिळते. व्याजाचे हे दर 1 एप्रिल, 2020 पासून लागू आहेत. या योजनेमध्ये तुम्ही कमीतकमी 100 रूपयांपासून खाते सुरू करू शकता. तसेच याच्या 100 च्या 10 पट रक्कम सुद्धा गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit)
आता पोस्टामधूनही टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना सुद्धा एक प्रकारच्या मुदत ठेव योजनेसारखी आहे. याचा टर्म डिपॉझिट कालावधी 4 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष असा हा कालावधी आहे. यात कमीतकमी 1 हजार रूपयांची गुंतवणूक करू शकता आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत 10 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट योजनेवर 6.7 टक्के व्याज मिळते. हे व्याज दरवर्षी मिळते पण व्याजाची मोजणी 3 महिन्यांनी केली जाते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate)
National Saving Certificate योजनेमध्ये तुम्ही दरवर्षी कमीतकमी 100 रूपयांची गुंतवणूक करू शकता. या याजनेमध्ये एक व्यक्ती अनेक खाती सुरू करू शकते. याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. NSCमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.
यामध्ये इन्कम टॅक्स कायदा, 1961 अंतर्गत 80C कलम अंतर्गत कर सवलतीचा फायदा मिळू शकतो. एनएससी (Post Office National Saving Certificate Scheme)वर 6.8 टक्के व्याज मिळतं आणि ते वार्षिक चक्रव्याजानुसार दिलं जातं. पण यावर मिळणारं व्याज हे योजना मॅच्युरिटी झाल्यानंतरच मिळतं. यामध्ये व्याज थेट दिलं जात नाही तर त्याची पुन्हा गुंतवणूक केली जाते.