सोने, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रिअल इस्टेट असे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही, सर्वसामान्यांकडून गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती ही मुदत ठेवींना (Bank Fixed Deposit) दिली जाते. प्रामुख्याने भारतात मुदत ठेवींचा पर्याय विशेष लोकप्रिय आहे. बँकांपासून ते पोस्ट ऑफिसपर्यंत विविध वित्तीय संस्थांकडून ठराविक व्याजदरावर मुदत ठेवींचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो.
मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असली तरी याचे काही तोटे देखील आहेत. तुम्ही देखील मुदत ठेवींच्या माध्यमातून बँकेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याचे तोटे जाणून घ्या व नंतरच निर्णय घ्या.
मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे
Table of contents [Show]
कमी व्याजदर
मुदत ठेवींच्या स्वरुपात पैसे जमा करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे कमी व्याजदर. बँकेत अथवा इतर वित्तीय संस्थांमध्ये 5 ते 7 टक्के व्याजदराच्या परताव्यासह मुदत ठेवीची सुविधा उपलब्ध असते. मात्र, हीच गुंतवणूक इतर ठिकाणी केल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. अनेक म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स वर्षाला 10 ते 12 टक्के परतावा देतात. एकीकडे महागाई वाढत असताना, व्याजदर मात्र समानच राहते.
निश्चित कालावधी
मुदत ठेवींचा कालावधी हा निश्चित असतो. तुम्ही बँकेत 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष अशा कालावधीसाठी पैसे गुंतवतात. त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा हे पैसे त्वरित काढता येत नाही. आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज असल्यास अशावेळी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, बँकेत ठेवलेली मुदत ठेव मॅच्युरिटी पूर्ण होण्याआधीच मोडल्यास तुम्हाला परतावा तर मिळतच नाही उलट शुल्क भरावे लागते.
संपत्ती वाढवण्याचा योग्य पर्याय नाही
कोणतीही व्यक्ती संपत्तीत वाढ करण्यासाठी व गरजेवेळी मदत व्हावी, या उद्देशाने गुंतवणूक करत असते. परंतु, मुदत ठेवी हा संपत्ती वाढवण्याचा मार्ग नाही. केवळ पैशांची सुरक्षितरित्या बचत व्हावी हा उद्देश असल्यास मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकता. परंतु, कमी व्याजदरामुळे हा संपत्तीत वाढ करण्याचा योग्य मार्ग ठरत नाही. उलट यामुळे तुमचे पैसे अडकून पडतात. त्याऐवजी स्टॉक्स, रिअल इस्टेटमध्ये हेच पैसे गुंतवल्यास तुम्हाला दुप्पट परतावा मिळू शकतो व संपत्तीतही वाढ होईल.
टीडीएस
मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टीडीएस भरावा लागतो. एका आर्थिक वर्षात मुदत ठेवींवरील व्याज हे 40 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास अशा स्थितीत कर भरावा लागतो. त्यामुळे तुम्हाला मिळणारा परतावा आपोआप कमी होतो.
केवळ 5 लाखांची हमी
सर्वसाधारणपणे मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. परंतु, बँक बुडाल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची हमी खूपच कमी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) नियमानुसार बँक बुडाल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव बंद झाल्यास खातेदाराला केवळ 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळण्याची हमी असते.
मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करावी की नाही?
तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर मुदत ठेवीचा विचार करू शकता. यात केलेल्या गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते. याशिवाय, वृद्ध नागरिकांना जास्त व्याजदराचा फायदा मिळतो. परंतु, संपत्ती वाढवण्याचा हा योग्य मार्ग नाही. तुम्ही सोने, स्टॉक्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्स अशा गुंतवणुकीच्या पर्यायांचाही विचार करू शकता.