भारतीय व्यक्तींसाठी सोने हे केवळ गुंतवणुकीचे माध्यम नाही. अनेकजण सोने हे दागिन्यांची हौस व प्रतिष्ठा म्हणूनही खरेदी करतात. प्रामुख्याने लग्नसराईच्या काळामध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते.
सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरीही भारतीयाकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जात आहे. मात्र, एखादी व्यक्ती कितीही सोने खरेदी करू शकते का? घरातील ठेवलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का? तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील तर याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घ्या.
एक व्यक्ती किती सोने स्वतः जवळ ठेवू शकते?
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार (सीबीडीटी) एखादी व्यक्ती ठराविक तोळेच सोने घरात ठेवू शकते. याशिवाय, जेवढे सोने स्वतः जवळ बाळगले आहे, त्याचे कायदेशीर पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची पावती तुमच्याकडे असायला हवा.
आयकर कायद्यानुसार, विवाहित महिलांना स्वतःजवळ 500 ग्रॅम सोने बाळगण्याची मूभा आहे. तर अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने स्वतः जवळ ठेवू शकतात. पुरुषांना केवळ 100 ग्रॅम सोने स्वतः जवळ बाळगता येईल.
तुम्ही डिजिटल सोने देखील खरेदी करू शकता. एखाद्या प्लॅटफॉर्मवरून डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. मात्र, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून किती सोने खरेदी करता येईल.
घरात ठेवलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का?
तुम्हाला जर आई-वडिलांकडून म्हणजेच वारसाहक्काने सोने मिळाले असल्यास त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. याशिवाय, मर्यादित स्वरुपात सोने घरात ठेवल्यास त्यावरही कोणताही कर भरावा लागत नाही. मात्र, यासाठी तुम्ही आयकर प्रणालींतर्गत येणाऱ्या उत्पन्न मर्यादेनुसारच गुंतवणूक केलेली असणे आवश्यक आहे. अनाधिकृतपणे सोने बाळगल्यास तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
तसेच, सोने खरेदी व विक्री करताना कर भरावा लागतो. तुम्ही जर सोने खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आत विकल्यास शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. तर 3 वर्षानंतर विक्री केल्यास लाँग-टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.
सोन्यात गुंतवणूक करायला हवी का?
इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोने खरेदी करणे कधीही सुरक्षित मानले जाते. मात्र, केवळ दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी डिजिटल सोने, एसजीबी, गोल्ड ईटीएफ देखील खरेदी करू शकता. सोन्याच्या किंमती नेहमीच वाढत असल्याचे दिसून आले आहे.
सर्वसाधारणपणे सोन्याच्या किंमतीत अचानक चढ-उतार पाहायला मिळत नाही. याशिवाय, सोने हे कधीही विक्री करता येण्यासारखे असते. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात सोन्याची विक्रीही करता येते. त्यामुळे एकूण गुंतवणुकीपैकी काही रक्कम सोन्यात गुंतवणे कधीही फायद्याचे ठरते.