Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Goal-Based Investing: ध्येय आधारित गुंतवणूक म्हणजे काय? तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी याचा कसा फायदा होईल? वाचा

Investment

Image Source : https://www.freepik.com/

ध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते.

नवीन घर खरेदी करायचे असेल, परदेशात फिरायला जायचे असेल, मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देशात पाठवायचे असेल अथवा निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगायचे असेल, अशा प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे ही सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ इच्छाशक्तीच नाही तर नियमित गुंतवणुकीची गरज असते. 

ध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते. तुमच्या आर्थिक ध्येयानुसार गुंतवणुकीचा कालावधी ठरवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे कमी वयातच गुंतवणुकीला सुरुवात केल्यास भविष्यात जास्तीत जास्त फायदा मिळतो.

तुम्ही देखील गुंतवणुकीला सुरुवात करत असाल तर त्याआधी ध्येय-आधारित गुंतवणूक म्हणजे काय?  अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन गुंतवणूक कशात करावी व याचे फायदे काय आहेत? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊयात.

ध्येय-आधारित गुंतवणूक म्हणजे काय?

तुमचे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणुकीच्या उद्देशाने केलेले योग्य आर्थिक नियोजन म्हणजे ध्येय-आधारित गुंतवणूक होय. यामध्ये तुमचे आर्थिक ध्येय व ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला ठराविक कालावधी लक्षात घेऊन गुंतवणूक केली जाते.

समजा, तुम्हाला परदेशात फिरायला जायचे आहे. अशावेळी तुम्ही आधीपासून यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती घेऊन बचत करायला सुरुवात करता. अशाच प्रकारे इतर आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन कालावधीनुसार गुंतवणूक करू शकता.

ध्येय आधारित गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात 

ध्येय व कालावधी

आर्थिक लक्ष्य निर्धारित करून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास फायदा होऊ शकतो. तुम्हाला पुढील काही महिन्यांमध्ये नवीन गाडी खरेदी करायचे आहे, शिक्षण पूर्ण करायचे आहे अथवा इतर कामांसाठी पैशांची गरज आहे, असे ध्येय ठरवून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

तुमच्या ध्येयानुसार गुंतवणुकीचा कालावधी ठरतो. अल्पकालीन गुंतवणूक ही सर्वसाधारणपणे 1 ते 3 वर्षांसाठी असते. तर दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी हा 5 वर्षांपेक्षा अधिक असतो. तुम्ही ध्येय ठरवून त्याप्रमाणे गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. 

जोखीम स्विकारण्याची क्षमता

गुंतवणूक करताना तुमचे उत्पन्न व जोखीम स्विकारण्याची क्षमता याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यावरूनच तुम्ही किती प्रमाणात गुंतवणूक करू शकता हे ठरते. 

समजा, तुमचे महिन्याचे उत्पन्न हे 25 हजार असून, यातील 15 हजार रुपये इतर गोष्टींसाठी खर्च होतात. अशावेळी उर्वरित संपूर्ण 10 हजार रुपये गुंतवणे योग्य ठरत नाही. या 10 हजार रुपयांपैकी 5 हजार रुपये बँकेतील चालू खात्यात जमा करावे व 5 हजार रुपयांची गुंतवणूक करावी. यामुळे गरज पडल्यास बचत खात्यातील पैशांचा वापर करता येतो. तसेच, पैसे गुंतवताना त्यातील जोखीमही लक्षात घ्यावी.

ध्येयानुसार करा गुंतवणुकीची विभागणीकोणत्याही व्यक्तीचे केवळ एकच आर्थिक ध्येय नसते. शिक्षणापासून ते घर खरेदी करण्यापर्यंत अशी अनेक स्वप्ने असतात. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीची विभागणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
मुलांचे शिक्षण, लग्नासाठी इक्विटी अथवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. गाडी खरेदीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करता येईल. समजा, तुमची महिन्याची बचत 10 हजार रुपये आहे. अशावेळी वेगवेगळे ध्येय निर्धारित करून या 10 हजार रुपयांची विभागणी करू शकता. 
गुंतवणुकीत हवी विविधताकोणतीही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित नसते. सोने, मुदत ठेव वगळता प्रत्येक गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीत विविधता असणे अत्यंत गरजेचे आहे. ध्येयानुसार विविध गोष्टीत पैसे गुंतवल्यास नुकसान टाळता येऊ शकते.
गुंतवणुकीत सातत्य महत्त्वाचेगुंतवणुकीमध्ये सातत्य व शिस्तबद्धता असल्यास कितीही मोठे आर्थिक ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. नियमित पैसे गुंतवल्याने चक्रवाढीचा फायदा मिळतो. समजा, तुम्हाला पुढील 5 वर्षात नवीन घर खरेदी करायचे आहे. अशावेळी तुम्ही गुंतवणुकीत सातत्य ठेवल्यास हे स्वप्न सहज पूर्ण करू शकता. 
ऑटोमॅटिक गुंतवणूकअतिरिक्त खर्चामुळे पैशांची बचत होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पैसे नियमित न गुंतवल्यास आर्थिक उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करणेही शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही ऑटोमॅटिक गुंतवणुकीचा पर्याय वापरू शकता. यामुळे दरमहिन्याला ठराविक तारखेला तुमच्या बँक खात्यातून आपोआप पैसे ठराविक ठिकाणी गुंतवले जातील. आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. 
गुंतवणुकीवर नियमित ठेवा लक्षपैसे गुंतवले व काम झाले, असे होत नाही. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे नियमितपणे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. तुम्ही जर स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेली असल्यास त्याकडे नियमित लक्ष द्यावे. बाजारातील स्थिती ओळखून वेळोवेळी त्यात बदल करावा. यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल.  
महागाईगुंतवणूक करताना महागाईचा विचार करणेही अत्यंत गरजेचे आहे. समजा, तुम्ही 2 वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करत आहात. मात्र, या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा वाढत्या महागाई दरापेक्षा नक्कीच कमी असेल. त्यामुळे जास्तीत जास्त परतावा मिळेल व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतील, अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी.

अल्पकालीन गुंतवणुकीचे पर्याय 

नवीन गाडी खरेदी करणे, भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल अथवा बाहेर फिरायला जायचे असेल, अशावेळी अल्पकालीन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. अल्पकालीन गुंतवणुकीचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 1 ते 3 वर्ष असतो. ही आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कशात गुंतवणूक करू शकता, त्याबाबत पुढे जाणून घेऊयात.

बचत खातेतुम्हाला दर काही महिन्यांनी पैशांची गरज भासत असेल व कोणतीही जोखीम स्विकारायची नसल्यास बँकेत बचत खाते उघडून त्यात गुंतवणूक करू शकता. बचत खात्यात जमा केलेल्या कमी व्याजदर मिळते, मात्र नुकसान होण्याचीही शक्यता कमी असते. 
आवर्ती ठेवी (Recurring deposits)आवर्ती ठेवीचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत असतो. तुम्ही दरमहिन्याला ठराविक रक्कम आवर्ती ठेवी खात्यात जमा करून तुमचे आर्थिक ध्येय पूर्ण करू शकता. समजा, तुम्हाला 1 वर्षांनी 1 लाख रुपयांची गरज आहे. अशावेळी आवर्ती ठेवी खात्यात दरमहिन्याला 8500 रुपये जमा करू शकता. याशिवाय, या ठेवीवर 2.50 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याजही मिळते.
मुदत ठेवमुदत ठेवीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. या गुंतवणुकीचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 7 दिवस ते 10 वर्ष असतो. तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीचा कालावधी ठरवू शकता. यावर कालावधीनुसार 6.50 ते 8.50 टक्के व्याजदर मिळते. वयोवृद्ध नागरिकांना अतिरिक्त व्याजदराचाही फायदा मिळतो.
पोस्ट ऑफिस बचत ठेवी  पोस्ट ऑफिस बचत ठेवी हा देखील काहीसा मुदत ठेव गुंतवणुकी सारखाच प्रकार आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीवर कालावधीनुसार 5.5 ते 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळते. 

मध्यमकालीन गुंतवणुकीचे पर्याय 

मुलांचे लग्न करण्यासाठी, शिक्षण पूर्ण करण्यासाठी अथवा घराचे नूतनीकरण करायचे असल्यास तुम्ही मध्यमकालीन गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्ष असतो. परंतु, तुमच्या आर्थिक ध्येयानुसार यात बदल करू शकता. मध्यमकालीन गुंतवणुकीचे कोणते पर्याय चांगले आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात.

म्युच्युअल फंडमध्यमकालीन आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडचा कालावधी हा तुमच्यावर निर्भर असतो. तुम्ही 3 ते 5 वर्षांसाठी यात गुंतवणूक करू शकता. काही म्युच्युअल फंड लॉक इन पीरियडसह देखील येतात. यात तुम्ही एसआयपी अथवा एकरकमी स्वरुपात गुंतवणूक करू शकता. 
एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF)गुंतवणुकीमध्ये विविधता आणण्यासाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड्स चांगला पर्याय आहे. हे एकप्रकारे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगसारखेच असते. ईटीएफमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता. तसेच, कितीही कालावधीसाठी यात गुंतवणूक करता येते. तुम्हाला हवा असलेला परतावा मिळाल्यास यातील गुंतवणूक काढू शकता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीचा कालावधी हा 5 वर्ष असतो. 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यातील गुंतवणूक काढता येते. त्यामुळे तुम्ही जर 5 वर्षांनंतरचे आर्थिक ध्येय निश्चित केले असल्यास यात गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीवर 7.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. विशेष म्हणजे ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. 
सोनेसर्वसाधारणपणे सोन्यातील गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी समजली जाते. मात्र, तुम्ही गरजेनुसार सोने मोडून पैशांचा वापर इतर आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करू शकता. सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तुम्ही जर दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करत असाल तर सोन्याच्या दागिन्यांचा विचार करू शकता. मात्र, मध्यमकालीन उद्देशाने डिजिटल सोने खरेदी केल्यास फायदा होऊ शकतो. 

दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय 

निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगायचे असेल अथवा जगभर प्रवास करायचा असेल तर नोकरी करत असतानाच दीर्घकालीन गुंतवणुकीला सुरुवात करायला हवे. अल्प व मध्यमकालीन गुंतवणुकीच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक करणे कधीही फायद्याचेच ठरते. दीर्घकालीन आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी कशात गुंतवणूक करू शकता, त्याविषयी जाणून घेऊया.

रियल इस्टेटरियल इस्टेटमधील गुंतवणुकीमधून तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळतो. तुम्ही पहिलेच घर घेत असाल अथवा गुंतवणूक म्हणून संपत्ती खरेदी करत असाल, दोन्हीबाबतीत रियल इस्टेट हा चांगला पर्याय आहे. भाडे भरण्यापेक्षा तीच रक्कम ईएमआय स्वरुपात स्वतःच्या घरासाठी वापरू शकता. तसेच, मालमत्ता भाड्याने देऊनही यातून दरमहिन्याला पैसे मिळतील. है पैसे दीर्घकालीन उद्देशाने गुंतवू शकता.
स्टॉक्सगेल्याकाही वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अनेकजण कमी कालावधीमध्ये जास्त पैसे कमवण्याच्या नादात ऑपशन्स ट्रेडिंगकडे वळाल्याचे पाहायला मिळतात. परंतु, शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असल्यास स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय आहे. तसेच, इक्विटीमधील गुंतवणूक ही दीर्घकालावधीसाठी असायला हवी. योग्य कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढे जाऊन फायदा होतोच.
पीपीएफ आणि ईपीएफकर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या सरकारी बचत योजना आहे. नोकरी करत असतानाच पगारातील ठराविक रक्कम यामध्ये गुंतवली जाते. पीपीएफ आणि ईपीएफमध्ये जेवढी जास्तीत जास्त रक्कम गुंतवाल, तेवढा अधिक फायदा भविष्यात होईल. निवृत्तीनंतरच्या तुमच्या आर्थिक योजना पूर्ण करण्यासाठी या गुंतवणुकीचा फायदा होईल.
सरकारी बचत योजना सरकारद्वारेही नागरिकांच्या सुविधेसाठी विविध योजना राबवल्या जातात. सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, अटल पेन्शन योजना अशा विविध योजनांमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. 

ध्येय आधारित गुंतवणुकीचे फायदे

स्पष्टताध्येय आधारित गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला बचतीबाबत स्पष्टता मिळते. अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन आर्थिक ध्येयानुसार खर्च व बचत किती करायची हे ठरवता येते. तुम्हाला ध्येयावर लक्ष केंद्रित करून गुंतवणुकीस प्रवृत्त करते. 
आर्थिक नियोजनात मदत1 वर्ष अथवा 5 वर्षांनी तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असल्यास, त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. ध्येय आधारित गुंतवणुकीमुळे अशाप्रकारचे नियोजन साध्य होते. तुम्हाला ठराविक कालावधी निश्चित करून बचत करण्यास मदत मिळते. 
गुंतवणुकीत विविधतातुमच्या आर्थिक ध्येयानुसार वेगवेगळ्या गोष्टीत व कालावधीनुसार गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीतील विविधतेमुळे तुमचे नुकसान होण्याचीही शक्यताही कमी होते. थोडक्यात, आर्थिक उद्देश निश्चित केल्यास गुंतवणुकीत विविधता आणण्यास मदत होते.
शिस्तबद्ध बचतशिस्तबद्ध बचत ही ध्येय आधारित गुंतवणुकीचा पाया आहे. नियमित बचतीशिवाय तुम्ही आर्थिक ध्येय पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या गुंतवणुकीमध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते. 
स्वप्न पूर्ण करण्यास मदतअशाप्रकारच्या गुंतवणुकीचा मूळ उद्देश हा वेगवेगळी स्वप्न पूर्ण करणे हा असतो. उच्च शिक्षण पूर्ण करायचे असो अथवा परदेशात फिरायला जायचे असेल, यासाठी जास्त खर्च येत असतो.त्यामुळे ठराविक उद्दिष्ट समोर ठेऊन गुंतवणूक केल्यास ही स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते.

लक्षात ठेवा की, खर्च व बचतीचे योग्यप्रकारे नियोजन केल्यास व त्याला आर्थिक नियोजनाची जोड दिल्यास तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय सहज साध्य करू शकता. मात्र, यासाठी गुंतवणुकीमध्ये सातत्य असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.