मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र हे अगदी साध्या पेपरवरही लिहलं जाऊ शकतं. मृत्यूपत्र स्टॅम्प पेपरवर किंवा लिगल पेपरवरच लिहीलं पाहिजे असा नियम नाही. कोर्टाच्या द़ृष्टीने हाताने लिहीलेलं मृत्यूपत्रही चालतं. मात्र त्यात सुसूत्रता यावी म्हणून किंवा लोकांना वाचायला सोपं पडावं म्हणून ती टंकलिखीत केली जाते. मृत्यूपत्र लिहीताना कोणत्याही प्रकारची न्यायालयीन भाषा वापरण्याची गरज नसते. तुमचं म्हणणं स्पष्ट शब्दात, संगती लागेल अशा तर्हेने लिहीणं गरजेचं आहे. त्यात संदिग्धता नसावी. कुणाला किती संपत्ती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा. संपत्तीचं वाटप करायला कोणाची नियुक्ती करणं बंधनकारक नाही पण संपत्ती मोठ्या प्रमाणावर असेल आणि त्याच्या वाटणीत भांडणं होण्याची शक्यता असेल तर मात्र अशा माणसाची नियुक्ती केलेली चांगली.
मृत्यूपत्राच्या प्रत्येक पानावर मृत्यूपत्र करणार्याची सही आवश्यक आहे. मृत्यूपत्राला दोन साक्षीदारांची गरज असते. हे साक्षीदार वयस्क, जाणकार आणि ज्यांचा या मृत्यूपत्रातील संपत्तीशी काही संबंध नाही असे असावेत. मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन करणं कायद्याने बंधनकारक नाही पण नंतर वाद होऊ नयेत म्हणून ते करण्याचा सल्ला दिला जातो. माणूस आपल्या हयातीत कितीही वेळा मृत्यूपत्र लिहू शकतो. त्यात बदल करू शकतो. त्याने लिहीलेलं शेवटचं मृत्यूपत्र कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरलं जातं.
मृत्यूपत्र लिहितानाचे महत्त्वाचे मुद्दे
1. संपत्ती आणि जोखीम यांची सूची तयार करणे- मृत्यूपत्र बनवताना आपली चल- अचल संपत्ती आणि आपल्यावर असणार्या जबाबदार्या यांची एक सूची तयार केली पाहिजे. त्यात जमिन,घर, बँकेतील ठेवी, पॉलिसी, शेअर्स, सोनं अशा सगळ्या गोष्टींचा समावेश करायला हवा. त्यात वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वकष्टार्जित अशा दोन्ही संपत्तींचा समावेश करायला हरकत नाही.
2. उत्तराधिकारी यांची सूची- त्यानंतर ही संपत्ती कोणाला मिळावी अशी इच्छा असेल त्या उत्तराधिकार्यांची सूची तयार करावी. त्यात नातेवाईक,पती- पत्नी, मुलं यांचबरोबर एखादी अशी व्यक्ती जी नातेवाईक नाही तरी जवळची आहे त्यांचाही उल्लेख करता येतो.
3. उत्तराधिकार्यांना दिल्या जाणार्या संपत्तीचे विवरण- त्यानंतर कोणाला किती संपत्ती द्यावी, ती कोणत्या स्वरूपात द्यावी याची एक सूची तयार करावी. त्यात संपत्तीचे स्वरूप आणि वारसाचे नाव अशी यादी करावी.
4. उत्तराधिकार्यांच्या टॅक्सचं प्लॅनिंग- तुम्ही दिलेल्या संपत्तीमुळे त्या वारसांना टॅक्सरूपात बोजा पडू नये याचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी असं प्लॅनिंग करावं की प्रत्येकाला योग्य वाटा मिळून त्यांना त्यावर कमीत कमी टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी एखाद्या टॅक्स प्लॅनरची मदतही घेता येईल.