आशिया खंडातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक वाईट बातमी आली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अदानी यांची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या सर्वेक्षणानुसार अदानी यांची संपत्ती 91.2 दशलक्ष डॉलरने घटली आहे. त्यामुळे ते आता जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असणार आहेत.
गौतम अदानी यांना श्रीमंतांच्या क्रमवारीत मागे टाकणारे उद्योगपती आहेत ॲमेझॉन या नामांकित ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस. उद्योगपती बेझोस यांच्या एकूण संपत्तीत 5.23 अब्ज डॉलरची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती आता 118 बिलियनवर पोहोचली आहे. अदानी आणि बेझोस यांच्या संपत्तीत फार मोठा फरक नसला तरी क्रमवारीत मात्र बेझोस पुढे आहेत.
जगातील श्रीमंतांच्या यादीत, फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट 182 अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.दुसऱ्या क्रमांकावर टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 132 अब्ज डॉलर इतकी आहे.
आशिया खंडात अदानीच नंबर वन!
आशिया खंडात मात्र गौतम अदानी हेच सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सर्वात वर आहेत. भारतात जवळजवळ सर्वच क्षेत्रात त्यांनी आपले उद्योगधंदे सुरु केले आहेत. रिलायंस उद्योगसमुहाचे मुकेश अंबानी हे जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असून त्यांची संपत्ती 87.6 अब्ज डॉलर इतकी आहे.