जगभरात मंदीची चाहुल लागली असून अनेक क्षेत्रांना आर्थिक अडचणींनी घेरले आहे. मंदीमुळे प्रामुख्याने ज्या क्षेत्राला फटका बसत आहे, ते म्हणजे माहिती तंत्रज्ञान. त्यासोबतच रिटेल क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. ॲमेझॉन ही बहुराष्ट्रीय कंपनी आयटी, रिटेल, ऑनलाइन कॉमर्स यासह अनेक क्षेत्रात काम करते. मात्र, मागील वर्षी नोव्हेंबरपासून कंपनीने नोकर कपातीस (Amazon Layoff) सुरुवात केली आहे. आता पुन्हा 18 हजारांपेक्षा जास्त नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी नोकरकपातीची घोषणा केली. मात्र, ही माहिती कर्मचाऱ्यांना देण्याआधीच त्यांचा मेल लिक झाला आणि सोशल मीडियावर पसरला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चाही सुरू होत्या.
ॲमेझॉन नोकरकपातीचा परिणाम डिव्हाइसेस, रिटेल शॉप विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने होणार आहे. जगभरामध्ये ॲमेझॉन कंपनीमुळे सुमारे साडेतीन लाख कर्मचारी आहेत. जागतिक मंदीच्या शक्यतेने कंपनीने नव्याने लाँच करण्यात येणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. तर सद्यस्थितीत चालू असलेल्या प्रकल्पांवरील बजेट कमी केले आहे. ॲमेझॉनसोबतच जगभरातील बलाढ्य कंपन्यांनीही नोकर कपात केली आहे.
माहिती लिक संबधी काय म्हणाले सीईओ?
ज्या कर्मचार्यांची नोकरी जाणार आहे त्यांनाच हा निर्णय सहसा थेट सांगितला जातो. मात्र, आमच्या एका सहकाऱ्याने ही माहिती आधीच कंपनीबाहेर आणली. त्यामुळे लगेच आम्ही ही माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत. १८ जानेवारीनंतर ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येणार आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल, असे जेसी म्हणाले.
काय लिहलं आहे मेलमध्ये?
ॲमेझॉन कंपनीचं २०२३ वर्षासाठीचे नियोजन सुरू आहे. विविध विभाग प्रमुख त्यांच्या टीमसोबत बसून भविष्यातील योजना, मनुष्यबळाची गरज आणि बजेटवर काम करत आहेत. ग्राहकांसाठी आणि कंपनीच्या भल्यासाठी जे योग्य असेल त्यास प्राधान्य देत आहोत. मात्र, अर्थव्यवस्थेतील अस्थिरता पाहता या वर्षीचा आढावा घेणे खूप अवघड आहे.
डिव्हाइसेस आणि बुक बिझनेस विभागातून काही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आल्याचे तुम्हाला आधीच सांगितले आहे. त्यासोबतच ह्युमन रिसोर्स, युझर एक्सपिरिअन्स, टेक्नॉलॉजी विभागीतील काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने निवृत्ती घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. २०२३ च्या सुरुवातीच्या काही दिवसांत आणखी काही कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल.
नोव्हेंबरमध्ये केलेल्या कर्मचारी कपातीव्यतिरिक्त आता आम्ही १८ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कामावरुन काढून टाकणार आहोत. या कर्मचारी कपातीचा अनेक विभागांवर परिणाम होणार असला तरी प्रामुख्याने अॅमेझॉन स्टोअर आणि पीटीएक्स ऑर्गनायझेशनवरती जास्त परिणाम होईल, असे जेसी म्हणाले.