अदानी उद्योग समुहाचे संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani) सध्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (Forbes List of Richest) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आणि 2022 च्या शेवटी त्यांची एकूण संपत्ती 121 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. आणि त्यांच्या वाढीचा दर आता आहे तोच राहिला तर काही आठवड्यांमध्ये ते श्रीमंतांच्या यादीत मस्क (Elon Musk) यांना मागे टाकून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. त्या विषयीचा एक अंदाज बघूया.
हा अंदाज बांधताना गौतम अदानी आणि एलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ होण्याचा दर आता आहे तितकाच राहील असं गृहित धरण्यात आलं आहे. याचा एक अर्थ अदानी यांची संपत्ती वाढतेय. आणि मस्क यांची आताच्याच दराने कमी होतेय असाही आहे. पण, सध्या घडतंयही तेच. आणि हाच ओघ सुरू राहिला तर येत्या पाच आठवड्यांमध्ये किंवा 35 दिवसांमध्ये अदानी मस्क यांना मागे टाकू शकतात.
आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीत 2022 मध्ये 44 अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे. आणि त्यांची एकूण संपत्ती 121 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. अदानी हे श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहातले असे एकमेव उद्योगपती आहेत, ज्यांची कोरोना आणि त्यानंतर आलेल्या मंदीच्या काळात आपल्या संपत्तीत वाढ केली आहे.
दुसरीकडे, एलॉन मस्क यांना टेस्ला इलेक्ट्रिक कारची मागणी घटल्यामुळे आणि ट्विटर ताब्यात घेताना झालेले वाद आणि नाचक्कीमुळे फटका बसला. आणि 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 340 अब्ज अमेरिकन डॉलरवरून खाली येऊन आता 137 अब्ज अमेरिकन डॉलरवर स्थिरावली आहे.
म्हणजे अदानी आणि मस्क यांच्या संपत्तीमध्ये आता 16 अब्ज अमेरिकन डॉलरचा फरक आहे. आणि हा फरक भरून काढण्यासाठी अदानींना 35 दिवस लागतील असा अंदाज आहे. त्याचं गणित काय आहे बघूया…
एलॉन मस्क त्यांनी मागच्या वर्षभरात दररोज सरासरी 0.36 अब्ज अमेरिकन डॉलर गमावले आहेत. त्यांच्या संपत्तीत दररोज ही घट झाली. उलट गौतम अदानी दररोज 0.12 अब्ज अमेरिकन डॉलर कमावत आहेत. आणि हे असंच 35 दिवस सुरू राहिलं तर अदानी मस्क यांना नक्की मागे टाकू शकतील.