प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेबाबत अनेकदा चर्चा होत असते. यासंदर्भात बोलताना अदानी यांनी हे विधान केले आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती अशी गौतम अदानी यांची ओळख आहे. नुकतीच त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका मीडिया ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'आम्ही22 राज्यांमध्ये व्यवसाय करतो’ असे ठणकावून सांगितले आहे.
अदानी ग्रुपच्या यशामागे पंतप्रधान मोदींची जवळीक असल्याची चर्चा अनेकदा केली जाते. तसा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा Gautam Adani म्हणाले की, “ही निराधार गोष्ट आहे. आम्ही 22 राज्यांमध्ये व्यवसाय करतो. सर्व राज्यात भाजपचे सरकार नाही.” ते पुढे म्हणाले, अदानी समूह डाव्याशासित केरळ, ममता दीदींच्या पश्चिम बंगाल, नवीन पटनायकांचा ओडिशा, जगनमोहन रेड्डी यासारख्या राज्यात व्यवसाय करत आहे. आम्हाला कोणत्याही राज्यात कोणतीही अडचण नाही.
अदानी पंतप्रधान मोदींच्या जवळीकतेविषयी म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पंतप्रधान मोदींची वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी राष्ट्रीय धोरणांवर बोलू शकता, पण जेव्हा धोरणे बनवली जातात तेव्हा ती फक्त अदानी समूहासाठी नसून सर्वांसाठीच असतात.’
‘मुकेश भाई (Mukesh Ambani) माझा खूप चांगला मित्र’
गौतम अदानी यांनीही ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबाबत उत्तरे दिली. ते म्हणाले, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक त्यांचे वडील धीरूभाई हे आमच्यासाठी आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांचा मुलगा मुकेश अंबानी हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्यांचा खूप आदर करतो. देशाच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी रिलायन्सला त्यांच्या पेट्रोकेमिकल व्यवसायाव्यतिरिक्त जिओ, तंत्रज्ञान, रिटेल क्षेत्रासह नवी दिशा दिली आहे.
येत्या काही वर्षांत भारत जगाला थक्क करेल
अदानी म्हणाले, देश प्रगतीच्या मार्गावर असल्याने माझ्या बिझनेसचे नंबर्स वाढले आहेत. आजपासून 20 ते 30 वर्षांनंतर भारत ज्या स्थितीत असेल ते पाहून जग चकित होईल. भारताची प्रगती आता कोणीही रोखू शकत नाही, असंही त्यावेळी Gautam Adani म्हणाले.