जी20 गटाचं अध्यक्षपद भारताकडे असताना जगभरात अन्नसुरक्षा रहावी यासाठी काम करू आणि त्यामध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जी20 देशांना मदत करू , असं अमेरिकेच्या ट्रेझरी सचिव जेनेट येलेन यांनी म्हटलं आहे. त्या अमेरिक-आफ्रिकी नेत्यांच्या परिषदेत बोलत होत्या.
अन्नसुरक्षा म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकाला किमान आवश्यक अन्न रोज खायला मिळणं. शरीराला आवश्यक अन्न मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार मानला जातो. जी20 देशांनी आपल्या अजेंडामध्ये जागतिक अन्नसुरक्षा ही आपली प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे. आणि त्यासाठी जागतिक स्तरावर मदत मागण्याचं धोरण ठेवलं आहे.
आफ्रिकन देशांमध्ये कुपोषणाचं प्रमाण इतर खंडांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. अंतर्गत यादवी आणि अपुरं शिक्षण अशी काही महत्त्वाची कारणं त्यामागे आहेत. अनेक आफ्रिकी देश जी20चे सदस्य आहेत. तर भारताही लहान मुलांमध्ये कुपोषणाची समस्या 50 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आहे.
त्यामुळे जी-20 परिषदेचं अध्यक्षपद आल्यावर भारताने जागतिक अन्नसुरक्षा हा मुद्दा कळीचा केला आहे. आणि त्यासाठी प्रगत देशांनी मदत करावी असं आवाहन केलं आहे. त्यालाच अमेरिकन ट्रेझरी सचिव जेनेट यांनी दिलेला हा प्रतिसाद आहे.
आफ्रिकन नेत्यांशी अन्नसुरक्षा या विषयावर बोलताना त्यांनी ‘भारताच्या बरोबर राहून जागतिक अन्नसुरक्षेच्या क्षेत्रात काम करु असं म्हटलंय. याविषयीचं आंतरराष्ट्रीय धोरण काय आहे याचा आढावा घेऊन आणखी काय करायची गरज आहे ते जाणून घेऊ,’ असं त्या म्हणाल्या.
जेनेट गेल्या महिन्यात भारतातही येऊन गेल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबरोबर त्यांच्या द्विपक्षीय बैठका झाल्या. आणि तेव्हाही भारताच्या जी20 परिषदेचं अध्यक्ष होण्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. अमेरिकेकडून सहकार्याचं वचनही त्यांनी दिलं होतं.
अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनीही अलीकडेच जागतिक अन्नसुरक्षेसाठी अमेरिका कटीबद्ध आहे असं म्हटलं होतं. अमेरिकेनं त्यासाठी जागतिक कृषि व अन्नसुरक्षा कार्यक्रमही सुरू केला आहे. यात आफ्रिका खंडातील कृषि उत्पादन वाढेल असे उपाय करणं तसंच जनतेला अन्न पुरवणं अशा दोन्ही पातळीवर काम होणार आहे.