आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपकार्यकारी संचालक गीता गोपीनाथ या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. जी-20 परिषदेची पुढची दिशा काय असावी यावर चर्चा करण्यासाठी सुरू असलेल्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठीच त्या भारतात आल्या आहेत .
त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारताच्या अध्यक्षपदावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यामते जागतिक स्तरावर सध्या तीन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. क्रिप्टो चलनामध्ये होणारे गैरव्यवहार रोखणं आणि त्यासाठी सरकारी नियंत्रण आणणं, पर्यावरणपूरक उद्योगांसाठी भांडवल उभं करणं आणि आंतरराष्ट्रीय कर्जाच्या बाबतीत सर्वसमाशेक धोरण ठेवणं.
‘जगात काही देश अस आहेत, जे अत्यंत गरीब आहेत. आणि कर्जाच्या विळख्यात बुडालेत. नवीन कर्जं मिळवणंही त्यांच्यासाठी मुश्किल झालंय. अशावेळी जी-20 देशांनी त्यांच्यामागे उभं राहावं अशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला अपेक्षा आहे. शिवाय हे काम कालबद्ध पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताने अध्यक्ष असताना त्यासाठी सुनियोजित प्रयत्न करावेत,’ असं गोपीनाथ म्हणाल्या.
जागतिक स्तरावर क्रिप्टोचलनांमध्ये होणाऱ्या घसरणीकडेही त्यांनी लक्ष वेधलं. ‘जागतिक स्तरावर होत असलेले काही घोटाळे आणि सध्याची घसरण बघता क्रिप्टे व्यवहारांवर सरकारी नियंत्रण गरजेचं झालंय. आणि ते सगळ्या देशांना समजवावं लागेल,’ असं गीता गोपीनाथ यांनी सांगितलं.
या दोन्ही गोष्टींसाठी जी-20 संघटना काही धोरण आणि कार्यप्रणाली ठरवू शकली तर ते जगासाठी चांगलं होईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला वाटतं.
जगासमोर आणखी एक आव्हान आहे ते जागतिक हवामान बदलांशी जुळवून घेणं. आणि त्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करायचं असेल तर जागतिक स्तरावर मोठी गुंतवणूक त्यासाठी लागणार आहे. सरकारचे हात त्यासाठी कमी पडणार असल्यामुळे जगभर देणगी मोहिमाही सुरू आहेत. जी-20 परिषदेकडून या उपक्रमासाठी भरीव निधी गोळा होईल, असा विश्वास गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केला.