Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Massive Job Cut in Meta: आता Meta मधील हजारो कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार, कंपनीचे नोकर कपातीचे संकेत

Meta, Mark Zuckerberg , Job Cut in Meta , Facebook

Image Source : www.britannica.com

Massive Job Cut in Meta: बड्या सोशल मिडिया कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. ट्विटरचा नोकर कपातीचा विषय ताजा असताना आता फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनने हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्तानंतर कॉर्पोरेट्समध्ये खळबळ उडाली आहे.

ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी गेल्याच आठवड्यात हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर हीच पद्धत आता सोशल मिडियातील आणखी एका कंपनीने स्वीकारली आहे.फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म्सने 11000 कर्मचाऱ्यांना कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. (Meta Plans for Massive Job Cut across the globe) यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.वॉल स्ट्रीट जर्नल या दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे.

मेटाची आर्थिक कामगिरी सुमार राहिली होती. ज्याचा फटका कंपनीच्या शेअरला बसला होता. मेटाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीने कंपनीचे शेअर भांडवल 67 बिलियन डॉलर्सने कमी झाले होते. आतापर्यंत 2022 मध्ये 50 लाख कोटी डॉलर्सचे बाजार भांडवल मेटा शेअरने गमावले आहे. कंपनीच्या माहितीनुसार सप्टेंबर 2022 अखेर मेटाचे जगभरात 87000 कर्मचारी आहेत. त्यातील काही हजार कर्मचारी कमी केले जाणार आहेत. 

जागतिक स्तरावर बहुतांश देशात मंदीचा प्रभाव वाढत आहे. वाढत्या महागाईने लोकांचे दैनंदिन जगणे मुश्किल बनले आहे. याचा एकूण परिणाम त्यांच्या राहणीमानावर आणि इतर खर्चावर झाला आहे. अर्थिक विकास दर मंदावला आहे. टिकटॉक, अॅपलशी स्पर्धा, प्रायव्हसीबाबत जगभरात कठोर होत असलेली नियमावली आणि मेटाव्हर्सवर होणाऱ्या खर्चात झालेली कपात यामुळे कंपनीच्या एकूण उत्पन्नावर परिणाम झाला आहे.  

कंपनीच्या सुमार कामगिरीमुळे आता शेअर होल्डर्स आणि गुंतवणूदार मार्क झुकरबर्गला जाब विचारु लागले आहेत. मेटा प्लॅटफॉर्म्सने भांडवली गुंतवणूक कमी करुन काटकसर करावी, अशी अपेक्षा शेअर होल्डर्स व्यक्त करत आहेत. मेटाने गुंतवणूकदारांचा विश्वास गमावला आहे. अनावश्यक कर्मचारी कमी करुन कंपनीने दैनंदिन खर्च कमी करावेत, असा सल्ला अल्टिमीटर कॅपिटल मॅनेजमेंट या शेअर होल्डरने मेटाला दिला आहे.

जूनमध्ये दिली होती कर्मचाऱ्यांना कल्पना

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांनी जूनमध्ये मेटाच्या कर्मचाऱ्यांना भविष्यात कठिण काळ येणार असल्याची कल्पना दिली होती.जूनमध्ये मेटाने इंजिनिअरिंगच्या जवळपास 30% पदांच्या भरतीचा प्लॅन रद्द केला होता.त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांना देखील अशा परिस्थितीबाबत संकेत दिले होते.

आणखी काही वर्ष काटकसर करावी लागणार

मार्क झुकरबर्ग याने यापूर्वीच मेटाव्हर्समधून परतावा मिळण्यासाठी आणखी काही वर्ष लागतील असे म्हटले होते. मात्र गुंतवणूक करताना कर्मचारी भरती स्थगित करणे, काटकसर करण्यासाठी अनावश्यक प्रोजेक्ट रद्द करावे लागतील. फेसबुकच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच नवीन भरती स्थगित करावी लागणार आहे.  

युरोप-अमेरिकेत मंदीचे सावट

रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोप आणि अमेरिकेत महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच दोन वर्ष कोरोनाशी सामना केल्याने येथील उद्योग धंद्यांचे कंबरडे मोडले आहे. आता बड्या कॉर्पोरेट आणि आयटी कंपन्यांनी नोकर कपातीला प्राधान्य दिले आहे. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांची यादी दिवसागणिक वाढत आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅमेझॉन, ट्विटर या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. खर्च कपात आणि मंदीचे कारण या कंपन्यांकडून सांगितले जात आहे. आता यात मेटा अर्थात फेसबुकची देखील भर पडली आहे. यामुळे युरोप-अमेरिकेत बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.