मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणारआहे. पालिकेचा कारभार मागील एक वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहे. त्यामुळे मुंबईत सुरु असलेल्या आणि मागील बजेटमध्ये घोषणा केलेल्या प्रकल्पांसाठी किती निधी मिळणार याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या संत्तातराबाबत भाजप-शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र जून 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर पालिकेतील अनेक शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका बजेटमध्ये कोणत्या प्रभागांना किती निधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. सत्ताधाऱ्यांनी मागील बजेटमध्ये जाहीर केलेल्या प्रकल्पांना मोडीत काढणे किंवा त्यासाठीचा निधी कपात होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
वर्ष 2023-24 साठी पालिकेने 45949 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही प्रकल्प अद्याप सुरु झालेले नाहीत. काही प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आले तर काही प्रकल्पांना केंद्र सरकार आणि पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली नाही.
या प्रोजेक्ट्सची झाली होती घोषणा
- गेल्या बजेटमध्ये मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन अर्थात हवामान बदलावर उपाययोजना करणारा महत्वाचा प्रोजेक्ट जाहीर करण्यात आला होता. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा प्रकल्प होता. मात्र अजूनही या प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही.
- पालिकेच्या हॉस्पिटलमधील कपडे धुवण्यासाठी वापरात असलेल्या लॉंड्रीचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी मागील बजेटमध्ये 32.8 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानंतर 160 कोटींचे टेंडर काढण्यात आले. मात्र हा खर्च अवास्तव वाढवण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आणि हे टेंडर रद्द करण्यात आले. दरम्यान लॉंड्रीसाठी जागाच उपलब्ध न झाल्याने हा प्रकल्प गुंडाळण्यात आला.
- मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1700 कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणांचे ग्रीन झोन्समध्ये रुपांतर करण्याचा टॅक्टिकल अर्बनिझम प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती.
- देवनार कत्तलखान्याचा विकास करण्याची घोषणा गेल्या बजेटमध्ये करण्यात आली होती. देवनार कत्तलखान्याला 55 वर्ष झाली आहेत. या कत्तलखान्याच्या पुनर्विकासाचे 60% काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी 402 कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. त्याशिवाय कोस्टल रोड प्रोजेक्टसारखा महत्वकांक्षी प्रकल्प पालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. रस्ते, स्ट्रोम वॉटर ड्रेन सिस्टम यासारखे प्रकल्प सुरु आहेत.