देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असलेल्या मुंबई महापालिका (MCGM)शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पालिकेच्या बजेटमध्ये यंदा मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. यंदाचे बजेट 50000 कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता आहे. जवळपास पाऊणे दोन कोटी नागरिकांना सोयी सुविधा महापालिकेकडून पुरवल्या जातात.
पालिकेसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. यात सर्वाधिक उत्पन्न प्रॉपर्टी टॅक्स, डेव्हलपमेंट फी, जीएसटी परतावा, पाणीपट्टी, गुंतवणुकीवरील व्याज उत्पन्न, एफएसआय विक्री करुन मिळणारा महसूल अशा विविध मार्गाने पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवते. (Income Source of BMC)
वर्ष 2022 मध्ये पालिकेकडे 92000 कोटींच्या ठेवी आहे. मागील वर्षभरात पालिकेकडील ठेवींची रक्कम तब्बल 18% ने वाढल्याचे दिसून आले. पालिकाला टॅक्स आणि विविध स्त्रोतातून जवळपास 30000 कोटींचा महसूल मिळतो.
देशात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू होण्यापूर्वी पालिकेसाठी जकात (Octroi) हा मुख्य आणि मोठा उत्पन्नाचा स्त्रोत होता. पालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल एक तृतीयांश उत्पन्न पालिकेला जकात करातून मिळत होते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर जकात कर रद्द करण्यात आला.
जकात रद्द झाल्यानंतर पालिकेसाठी मालमत्ता कर हाच उत्पन्नासाठी मुख्य स्त्रोत आहे. यंदाच्या वर्षी प्रॉपर्टी टॅक्समधून 5500 ते 6000 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शहरात विकास शुल्क देखील आकारले जाते. विकास शुल्कातून पालिका दरवर्षी हजारो कोटींचे उत्पन्न मिळवते.
पालिकेचे जसे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत त्याचप्रमाणे खर्चाच्या अनेक वाटा आहेत. पालिकेकडून 108 विभागांना बजेटमध्ये निधीची घोषणा केली जाते. त्यापैकी 7 ते 8 महत्वाच्या विभागांना प्राधान्याने भरीव तरतूद केली जाते. पालिका उत्पन्नाचा बराचसा भाग आरोग्य सुविधा, शिक्षण, झोपडपट्टी सुधार, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, कर्मचारी वेतन आणि पेन्शन, कर्जांवरील व्याजाची परतफेड, पायाभूत सेवांसाठी खर्चाची तरतूद अशा कारणांसाठी खर्च करत असते.
नगरसेवकांना किती मिळतो निधी?
मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. या महापालिकेच्या नगरसेवकांना विकास निधी म्हणून कोट्यावधी रुपये पालिका प्रशासनाकडून मंजुर केले जातात. नगरसेवकाला दरवर्षी 60 लाख रुपये आणि एक कोटी रुपये विकास कामांसाठी मंजूर केले जातात. नगरसेवकांना दरमहा 50000 रुपयांचे वेतन दिले जाते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            