मुंबईला जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जातात. पालिकेकडून शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. चालू वर्षात शहराच्या सुशोभीकरणाकरिता (Mumbai beautification project) 24 वॉर्डसाठी प्रत्येक 30 कोटी देण्यात आले होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील प्रशासकांना बजेटपूर्वी सूचना केल्या आहेत. शनिवारी सादर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्था सशक्तीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे.
चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांसाठी सुशोभीकरणांच्या कामाकरिता पालिकेच्या 24 वॉर्डसाठी 892 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक वॉर्डला 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. यात वॉर्डमधील लादीकरण, फूटपाथ आणि रस्त्यांच्या दुतर्फा सुशोभीकरणाचे कामे, वॉर्डमधील डिजीटल बोर्ज, बगिचे आणि उद्यानांमधील सुशोभीकरण, दिवाबत्ती, कारंजे यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
रस्त्यांमधील डिव्हायडर, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, फूटपाथ, जक्शंनवरील सुशोभीकरणाच्या कामासाठी 1750 कोटींची तरतूद गेल्या बजेटमध्ये करण्यात आली होती. त्यापैकी 500 कोटी वितरित करण्यात आले होते.
आठ राज्यांपेक्षाही मोठे आहे मुंबई महापालिकेचे बजेट
वर्ष 2022-23 साठीचा महापालिकेचा बजेट हा 45949 कोटींचा होता. त्याआधीच्या वर्षात 2021-22 मध्ये पालिकेच्या बजेटचा आकार 39038.83 कोटी इतका होता. विशेष मुंबई महापालिकेचे बजेट हे देशातील आठ राज्यांच्या बजेटपेक्षा मोठे आहे. त्रिपुरा, नागालॅंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि गोवा या राज्यांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे.