जगातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍपल कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झटका बसला आहे. कुक यांच्या पगारात 40 टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध आयफोन (iPhone) निर्माता Apple कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी लक्षणीय घट झाली होती आणि त्यामुळे त्याचे मार्केट कॅप देखील घसरले होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कुक यांना या वर्षी $49 मिलियन (सुमारे चार अब्ज रुपये) मिळतील. कुक यांनी स्वतः कंपनीला आपले वेतन कमी करण्याची विनंती केली होती. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये कुक यांचे वार्षिक उत्पन्न 9.94 अब्ज डॉलर इतके होते. यामध्ये 30 लाख डॉलर मूळ पगार, 8.3 करोड स्टॉक अवॉर्ड आणि बोनसचा समावेश आहे. त्यापूर्वी 2021 मध्ये त्यांना 9.87 करोडचे एकूण वेतन पॅकेज मिळाले होते.
नवीन नियमानुसार, टिम कुक यांच्याकडे असलेल्या स्टॉक युनिट्सची टक्केवारी 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे शेअर्स ऍपलच्या आर्थिक कामगिरीवर अवलंबून आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, कूक यांचे नवे पॅकेज शेअरधारकांच्या प्रतिक्रिया, ऍपलची आर्थिक स्थिती आणि कुक यांच्या स्वतःच्या शिफारसींच्या आधारे ठरवण्यात आले आहे. गेल्या वर्षी कुक यांच्या पॅकेजवर अनेक भागधारकांनी टीका केली होती. परंतु बहुतांश भागधारकांनी याला पाठिंबा दिला होता.
सर्व संपत्ती दान करण्याचा संकल्प!
गेल्या वर्षी, कुक यांच्या इक्विटी अवॉर्डचे मूल्य 7.5 करोड डॉलर इतके होते. 2023 मध्ये त्यांचे पॅकेज कंपनीच्या स्टॉकच्या कामगिरीनुसार कमी-अधिक होऊ शकते. कुक यांनी स्वतःहून आपले पॅकेज कमी करण्याची शिफारस कंपनीला केली होती. असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. कूक यांना गेल्या वर्षी 60 लाख डॉलर इतका बोनस मिळाला होता, तर 4 करोड डॉलर इतकी रक्कम इक्विटी अवॉर्डच्या रुपात मिळाले होते. 62 वर्षीय कुक यांनी आपली सर्व संपत्ती सामाजिक कार्यासाठी देण्याचे ठरवले आहे. दरवर्षी जगभरातील गरजू लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी कुक त्यांची सर्व संपत्ती दान करत असतात.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            