चीनमधील कॅमेराची निर्मिती करणारी कंपनी सनी ओपोटेक (Sunny Opotech) या कंपनीने अॅप्पल (Apple) कंपनीसोबत करार केला असून या करारांतर्गत सनी ओपोटेक भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक करून ऑप्टिकल टेक्नॉलॉजीचे (Sunny Optical Technology) युनिट सुरू करणार आहे. सनी ओपोटेक कंपनीचे अध्यक्ष वेली लियू यांनी बिझनेसलाईनशी बोलताना सांगितले की, 2026 पर्यंत हा प्रोजेक्ट वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण केला जाईल. तो भारतात कुठे उभारला जाईल हे अजून निश्चत करण्यात आलेले नाही. पण या प्रकल्पामध्ये अॅप्पलचे फक्त आयफोनच नाही तर लॅपटॉप, मॅकबुक ही तयार केले जाणार आहेत.
चिनी कंपनी सनी ओपोटेक आणि अॅप्पल यांच्यातील करारानुसार या प्रकल्पातून अंदाजे 300 ते 600 मिलिअन डॉलर्स इतका महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. सुरूवातीच्या टप्प्यात हे लक्ष्य 300 मिलिअन डॉलर्स इतकेच असणार आहे. कालांतराने त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. दरम्यान जे प्रोडक्ट्स भारतात तयार केले जाणार आहेत. त्याची चाचणी अगोदर चीनमध्ये घेतली जाणार आहे. त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच त्याचे उत्पादन भारतात सुरू केले जाणार आहे. अॅप्पलच्या उत्पादनाचे प्रमाण वाढण्यासाठी अजून किमान 1-2 वर्षांचा कालावधी लागू शकेल. त्यानंतर मात्र भारतात अॅप्पलच्या उत्पादनाची संख्या वाढेल.
सनी ओपोटेक पूर्वीपासून भारतात कार्यरत
कॅमेऱ्याची निर्मिती करणारी सनी ओपोटेक ही कंपनी भारतात पूर्वीपासून कार्यरत आहे. तामिळनाडूमधील तिरुपती येथे कंपनी 3 वर्षांपासून अॅण्ड्रॉईड फोनसाठी कॅमेरा बनवण्याचे काम करत आहे. सन ओपोटेकची अॅप्पलसोबतच्या भागीदारीनंतरही सेलकॉनसोबत असलेली भागीदारी कायम राहू शकते.
चिनी कंपनीचा फायदा काय?
सनी ओपोटेक भारतात अॅण्ड्रॉईड फोनसाठी कॅमेरा बनवण्याचे काम करत आहे. आता अॅप्पलसोबत भागीदारी केल्याने सनी ओपोटेकचा व्यवसाय भारतात बऱ्यापैकी सेटल होईल. सध्या मोबाईल कॅमेराचा बिझनेस अंदाजे 30 अब्ज डॉलर इतका आहे. यामध्ये अॅप्पलचा सर्वाधिक वाटा म्हणजे 150-180 मिलिअन इतका आहे. सनी ओपोटेकने 2026 पर्यंत अॅप्पलला अपेक्षित असलेले कॅमेरे पुरवल्यास कंपनीला चांगलाच फायदा होऊ शकतो.