Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC in Profit: सरकारच्या योजनांमुळे एसटीला अच्छे दिन; मे महिन्यात 913 कोटींचे उत्पन्न

MSRTC in Profit

Image Source : www.goibibo.com

MSRTC in Profit: 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना आणि सरसकट महिलांना तिकिटामध्ये दिलेली 50 टक्के सवलत योजनेमुळे एसटीच्या प्रवाशी संख्येत तर वाढ झालीच आहे. पण त्याचबरोबर एसटीच्या उत्पन्नात वाढ देखील होऊ लागली आहे.

MSRTC in Profit: मागील दीड ते दोन वर्षात एसटी महामंडळाला आणि एसटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण ही स्थिती आता बऱ्यापैकी सुधारली असून राज्य सरकारने एसटी महामंडळाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे एसटीला अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात एसटी महामंडळाला तब्बल 913 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

नुकतेच या 1 जूनला एसटी महामंडळाला 75 वर्षे पूर्ण झाली. गेले काही महिन्यांपासून तोट्यात चाललेली आणि विविध अडचणींच्या गर्तेत सापडलेली एसटी आता सुसाट धावू लागली आहे. राज्य सरकारने मागील वर्षापासून सुरू केलेली 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना आणि सरसकट महिलांना तिकिटामध्ये दिलेली 50 टक्के सवलत योजनेमुळे एसटीच्या प्रवाशी संख्येत तर वाढ झालीच आहे. पण त्याचबरोबर एसटीच्या उत्पन्नात वाढ देखील होऊ लागली आहे.

31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यात   

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या सवलतीमुळे ग्रामीण भागात एसटीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या सवलतींमुळे एसटीच्या एकूण 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यात आहेत. मे 2022 मध्ये एसटी महामंडळाला एकूण 601 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ते यावर्षी म्हणजे मे 2023 मध्ये 913 कोटी रुपयांवर गेले आहे.

एसटीला नवसंजीवनी!

सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना तिकिटांमध्ये सरसकट 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा सरकारवर अनेकप्रकारे टीका करण्यात आली. काहींनी निवडणुकांचा जुमला तर काहींनी रेवडी कल्चरला प्रोत्साहन अशा शब्दांत हेटाळणी केली. यामागील राजकारण सोडले तर सरकारच्या या दोन निर्णयांमुळे डबघाईत आलेली एसटी आता पुन्हा नव्या जोमाने धावू लागली आहे. या योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत नक्कीच वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर एसटीच्या तिजोरीत चांगला महसूल गोळा होत आहे. ही खूप जमेची बाजू आहे.

दररोजच्या उत्पन्नातही वाढ!

मागील वर्षी मे महिन्यात एसटीला दररोज 19.35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यात यावर्षी बऱ्यापैकी वाढ झाली असून मे 2023 मधील दररोजचे उत्पन्न 29.50 कोटी रुपये झाले. एसटी महामंडळ प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी विविध योजना राबवत आहे.  एसटीची 'आवडेल तिथे प्रवास' ही योजनाही भारी आहे. या योजनेतून प्रवाशांना 4 आणि 7 दिवसांचे पास दिले जातात. या पासने तुम्हाला वाटेल तिथे आणि वाटेल तेवढा प्रवास करता येतो.