MSRTC Scheme: राज्यातील नागरिकांना स्वस्तात मस्त प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र् राज्य परिवहन सेवा मंडळातर्फे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.यामध्ये एकाच मार्गावर नोकरी करणारे, व्यवसायानिमित्त सातत्याने प्रवास करणारे तसेच सुट्ट्यांमध्ये पर्यटन किंवा धार्मिक यात्रेनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सवलत मिळवून देणाऱ्या योजना राबवत आहे. या योजना कोणत्या आहेत आणि त्याचा लाभ प्रवास करताना कसा घेता येऊ शकेल. हे आपण पाहणार आहोत.
Table of contents [Show]
त्रैमासिक पास योजना
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य महामंडळातर्फे त्रैमासिक पास योजना राबवली जात आहे. ही योजना एकाच मार्गावर सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरीता लाभदायक ठरू शकते.या योजने अंतर्गत तीन महिन्यांचा पास काढणाऱ्या प्रवाशांना एसटी मंडळातर्फे जवळपास 50 टक्के सवलत दिली जाते. ही योजना साध्या आणि निमआराम गाड्यांकरीता उपलब्ध आहे.
जवळच्या एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो. अर्जासोबत अर्जदाराला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्या रूटवरील 3 महिन्यांच्या तिकिट दराइतके पैसे महामंडळाकडे जमा करणे गरजेचे आहे.
मासिक पास योजना
त्रैमासिक पास योजने प्रमाणेच एसटी महामंडळ 1 महिन्याचा मासिक पास देखील वितरित करते. या योजनेंतर्गत एसटी महामंडळ 20 दिवसांचे परतीचे प्रवास भाडे आकारून 10 दिवसांचे नियमित प्रवासभाडे आकारून, 30 दिवसांच्या कालावधीचा पास देते. या योजने अंतर्गत प्रवाशांना प्रवास भाड्यात एसटी 33.33 टक्के सवलत देते. यासाठी अर्ज करण्याची पद्धत त्रैमासिक पास योजने प्रमाणेच आहे.
वार्षिक सवलत कार्ड योजना
प्रवाशांनी फिरण्यासाठी जास्तीत जास्त एसटी गाड्यांचा वापर करावा यासाठी एसटी महामंडळातर्फे वार्षिक सवलत कार्ड योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कार्डवर प्रवाशांना तिकिटाच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते.
प्रवाशांना कोणत्याही एसटी डेपोमध्ये जाऊन वार्षिक सवलत कार्ड मिळवता येऊ शकते. याचे वार्षिक मूल्य 200 रुपये आहे. या कार्डद्वारे प्रवाशी राज्य आणि आंतरराज्य मार्गावरील बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करू शकतात. ही सेवा व्होल्वो, मिनी, शहरी, जनता आदी सेवा देणाऱ्या बसेसला लागू नाही.
आवडेल तिथे प्रवास
पर्यटन, सहल किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याकरीता सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी आवडेल तिथे प्रवास ही योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत प्रवाशी 4 किंवा 7 दिवसांचा पास काढू शकतात. हा पास साधी एसटी बस, जलद सेवा, रात्रसेवा, शहरी बससेवा, मिनी, निमआराम आणि राज्याबाहेर जाणाऱ्या बसेसवर लागू आहे. सात दिवसांच्या पाससाठी 18 वर्षावरील प्रवाशांना साध्या बससाठी 2040 रुपये तर 12 वर्षांखालील मुलांसाठी 1025 रुपये मोजावे लागतील. शिवशाही बससाठी प्रोढांना 3030 रुपये आणि मुलांना 1520 रुपयांत 7 दिवसांचा पास मिळू शकतो.
या विविध योजनांप्रमाणेच एसटी महामंडळातर्फे विविध घटकातील लोकांसाठीही सवलत योजना राबवली जाते. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे तसेच पालकांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी व्हावा, यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मासिक पास सवलत योजना राबवली जाते. त्याचप्रमाणे मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत योजना देखील राबवली जात आहे.