महाराष्ट्र शासनाने एसटीच्या प्रवासामध्ये महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. तेव्हापासून महिलांची प्रवासी संख्या वाढतांना दिसून येत आहे. शहरी भागात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तेथील महिलांना याचा जास्त फायदा घेता येत नाही. पण अनेक गावांमध्ये सोईसुविधा कमी असल्याने तेथील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे ग्रामीण भागातील महिला या योजनेचा पुरेपूर लाभ घेतांना दिसत आहे. शासनाने महिलांना एसटी प्रवासामध्ये दिलेल्या 50 टक्के सवलतीमुळे खासगी वाहन व्यवसायाला मात्र मोठा फटका बसला आहे.
शासनाने यापूर्वी 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासामध्ये तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी 75 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची योजना सुरू केली, तर सध्या महिला सन्मान योजनेंतर्गत सरसकट महिलांना एसटी प्रवासासाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजना सुरू करून त्वरित या योजनेची अंमबजावणी सुरू केली आहे.
वाट पाहीन,पण एसटीनेच जाईन!
खासगी वाहन आणि एसटी बसच्या तिकीट दरात 5 ते 10 रुपयांचा फरक येतो. त्यामुळे आधी सर्व महिला जास्तीत जास्त प्रवास खासगी वाहनांनी करत होत्या. बसची वाट पाहत कोण थांबणार? असं म्हणत खासगी वाहनांनी निघून जात होत्या. पण, आता तब्बल 50% सवलत म्हटलं तर महिला बसची वाट पाहणे कबूल करतात, आणि बसनेच प्रवास करतात. यामुळे ऑटो, नटवर आणि आणखी काही खासगी ट्रॅव्हल्सच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
खासगी वाहन चालकांना आता दिवसभर थांबून प्रवासी जमा करून ट्रीप घ्यावी लागते. काही वेळा भाड्याचा दर कमी करुन अॅडजस्ट करावं लागतं. केवळ पुरुष प्रवाशांच्या भरवशावर हा व्यवसाय करणे म्हणजे दिवसाला खासगी वाहतुकीची एक फेरी पूर्ण होणे अशक्यप्राय झाले आहे.
इन्कमवर परिणाम तर झालाच आहे…
रिक्षा चालकाशी चर्चा केली असता ते सांगतात, इन्कमवर परिणाम तर झालाच आहे, कारण उन्हाळा म्हटलं की, लग्नसराईचा हंगाम असतो. त्याचबरोबर मुलांना सुट्टी असल्याने माहेरी जाण्याचे प्रमाण सुद्धा असते. अशा वेळेत भरपूर कमाई असते. पण, आता 50% सवलत म्हटल्यावर कोणीही तोच पर्याय घेईल. महिलांचा प्रवास आता जास्तीत जास्त एसटी बसने होत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी इन्कम खूप कमी झाले आहे. असे नाही की, सर्वच महिला एसटीनेच प्रवास करतात पण प्रमाण वाढले आहे.