जेव्हा आपण बॅकांकडून घरासाठी कर्ज घेतो. तेव्हा बॅंका कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची आर्थिक पत तपासून त्याला त्याच्या पगाराच्या आधारावर कर्ज देत असते. या कर्जाची रक्कम संबंधित कर्जदाराला प्रत्येक महिन्याला ईएमआय (EMI) भरून ठराविक मुदतीमध्ये परत करायची असते. हा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टिने इन्कम टॅक्स कायद्यानुसार होम लोन (Home Loan) घेणाऱ्या व्यक्तीला टॅक्समध्ये सवलत घेण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराला बॅंकेकडून प्रोव्हिशनल होम लोन सर्टीफिकेट (Provisional Home Loan Certificate) घ्यावे लागते.
बँका होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना चालू वर्षातील कर्जाची माहिती देणारं प्रोव्हिशनल म्हणजेच तात्पुरतं सर्टीफिकेट देतात. ज्यात चालू आर्थिक वर्षाचे व्याज आणि लोनमधील शिल्लक मुद्दल रकमेचा समावेश असतो. यालाच प्रोव्हिशनल होम लोन सर्टीफिकेट (Provisional Home Loan Certificate) म्हणतात. होम लोन घेणाऱ्याला व्यक्तीला इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. होमलोनवरील मुद्दल रकमेच्या पेमेंटवर कलम 80C द्वारे आणि कर्जावरील व्याजाच्या देयकासाठी कलम 24 अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. ही सवलत अनुक्रमे 1.5 आणि 2 लाखांपर्यंत मिळू शकते.
प्रोव्हिशनल सर्टीफिकेटमुळे कर्जदारांना त्यांच्या सध्याच्या होमलोनवरील मुद्दल आणि व्याजाची माहिती जाणून घेण्यास मदत होते. होमलोन प्रोव्हिशनल सर्टीफिकेट आणि इंट्रेस्ट सर्टीफिकेटचा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यास आणि टॅक्सवर लाभ मिळवण्यास कशी मदत होऊ शकते, हे पाहू या.
होम लोन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हणजे नेमके काय?
एखादी व्यक्ती जेव्हा होमलोन घेते, तेव्हा होमलोन देणारी बॅंक कर्जदाराला आर्थिक वर्षाच्या सुरूवातील कर्जाच्या रकमेवर आकारले जाणारे व्याजदर आणि त्या दरानुसार बँकेला भरावे लागणारे व्याज आणि मुद्दल यांची सविस्तर माहिती देते, त्याला होम लोन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हटले जाते.
Bankbazaar.com चे सीईओ अधिल शेट्टी हे याबाबत स्पष्ट करतात की, “या माहितीला/स्टेटमेंटला होमलोन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हणजेच गृहकर्जाचे तात्पुरते प्रमाणपत्र म्हटले जाते. कर्ज घेताना बॅंकेकडून मान्य केलेल्या अटी आणि बॅंकेनी कर्जावर दिलेल्या व्याजदरानुसार तो कर्ज परतफेडीचा अंदाज असतो.”
या सर्टिफिकेटची गरज का लागते?
नोकरदार/पगारदार व्यक्तीला एका आर्थिक वर्षात टॅक्स बचत करणार्या गोष्टींचा अंदाज घेणं गरजेचं असतं. जर एखाद्या व्यक्तीने होमलोन घेतले असेल तर त्याला कलम 80C, कलम 24, कलम 80EEA अंतर्गत टॅक्स सवलतीचे फायदे घेता येतात. यासाठी त्याला त्या आर्थिक वर्षातील कर्जावरील व्याज दर आणि मुद्दल रकमेवरील परतफेडीच्या अंदाजाचे तपशील सादर करावे लागतात. यासाठी कर्ज देणाऱ्या बॅंका प्रत्येक आर्थिक वर्षासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला होमलोन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट देते. या सर्टिफिकेटमध्ये त्या आर्थिक वर्षातील अंदाजित आकारले जाणारे व्याज आणि मुद्दल याची आकडेवारी दिलेली असते. तसेच चालू आर्थिक वर्षातील थकित कर्ज किती आणि वर्षा अखेरपर्यंतचे अंदाजित थकित कर्ज, असे तपशील त्यात दिलेले असतात. या सर्टिफिकेटच्या आधारावर कर्ज घेणारी व्यक्ती टीडीएस कपातीचे नियोजन करू शकते.
होम लोन इंट्रेस्ट सर्टिफिकेट कसे मिळवायचे?
कर्ज घेणारी व्यक्ती ऑनलाईन बँकिंगद्वारे, ईमेल पाठवून किंवा बॅंकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून किंवा बँकेच्या शाखेत अर्ज देऊन होमलोन इंट्रेस्ट सर्टिफिकेटची मागणी करू शकता. जर तुम्ही संयुक्तपणे (Jointly) होमलोन घेतले असेल, तर तुम्ही मालमत्ता आणि कर्जाच्या मालकीच्या टक्केवारीनुसार विभाजन करून बँकेकडून होमलोनचे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळवू शकता.