TDS हा टॅक्स वसूल करण्याची एक सिस्टिम आहे. कापला गेलेला टॅक्स सरकारकडे जमा होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, पगार किंवा उत्पन्न म्हणून जो पैसे देणारा आहे, त्याने अगोदरच संपूर्ण उत्पन्नावर टॅक्स लावून ठराविक रक्कम कापून घ्यायची आणि उरलेली रक्कम संबंधिताला द्यायची. ही कापलेली रक्कम संपूर्ण माहितीसह सरकारकडे जमा करण्याच्या प्रक्रियेला टीडीएस म्हटले जाते.
टीडीएस कशावर कापतात?
टीडीएस उत्पन्नाच्या वेगवेगळ्या स्त्रोतांवर लागू होतो आणि तो ठराविक मूल्यापेक्षा अधिक असेल तर तो कापला जातो. म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागू होतो. पगार, कमिशन, व्यावसायिक मूल्य, ठेवींवरील व्याज, भाडे आदींवर टीडीएस लागतो. टीडीएस हा इन्कम टॅक्सचाच एक भाग असल्याने गरजेपेक्षा अधिक उत्पन्नातून तो कापला जातो. टीडीएस हा अगोदरच कापला जात असल्याने तुम्ही आयटीआर फिलिंग करून आवश्यक कागदपत्रे जमा करून कापलेला टीडीएस परत मिळवू शकता.
टीडीएस कोण भरतं?
पेमेंट देणारी व्यक्ती किंवा संस्थेवर टीडीएस भरण्याची जबाबदारी असते. त्यांना डिडक्टर म्हटले जाते. तसेच टॅक्स कापून पेमेंट मिळणाऱ्या व्यक्तीला डिडक्टी म्हटले जाते. टीडीएस म्हणून कापलेली रक्कम सरकारी खात्यात जमा करणे गरजेचे असते. तसेच कापलेल्या टीडीएसचे सर्टीफिकेट देऊन किती टीडीएस कापला हे दाखवावे लागते.
पगारावर टीडीएस
टीडीएसशी सर्वांत पहिला संबंध नोकरीला लागल्यानंतर येतो. नोकरीत रुजू झाल्यावर आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला कंपनी (एम्प्लॉयर) पुढील आर्थिक वर्षात करणाऱ्या गुंतवणुकीचा तपशील भरून द्यायला सांगतो. यात इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C, 80D अंतर्गत आणि करबचतीसाठी असलेल्या इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करून टॅक्स सवलत मिळवण्याची संधी असते . ही सवलत मिळवूनही पगार मर्यादेपेक्षा अधिक दिसत असेल तर पगारातून टीडीएस कापला जातो.
बॅंक ठेवींवर टीडीएस
बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवर (Fixed Deposit) ही टीडीएस लागतो . तसेच बचत खात्यांतील रकमेवरही वार्षिक व्याज दहा हजार रुपयांच्या वर गेले तर बँक त्यावरील टीडीएस कापून मुद्दल आणि व्याजाच्या परताव्याची रक्कम देते.
घरभाडे, घरविक्री उत्पन्नावर टीडीएस
एखाद्या व्यक्तीला घरभाडे उत्पन्न मिळत असेल तर त्यावरही टीडीएस लागू शकतो. घरभाड्याची वर्षभरातील रक्कम 1 लाख 80 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर टीडीएस लागत नाही. पण यापेक्षा अधिक घरभाडे असेल तर 10 टक्के दराने टीडीएस लागू होतो.
सोने-चांदी खरेदीवर टीडीएस
सोने किंवा चांदीच्या खरेदीसाठी 2 लाखांहून अधिक रोख रक्कम वापरली जात असेल तर त्या व्यवहारात विकणारा खरेदीदाराकडून 1 टक्का टीडीएस कापून घेईल आणि तो सरकारकडे जमा करेल.