Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Joint Account: संयुक्त खाते म्हणजे काय? समजून घ्या फायदे-तोटे

Joint Account: संयुक्त खाते म्हणजे काय? समजून घ्या फायदे-तोटे

संयुक्त खाते (Joint Account) जे पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, विश्वासू सहकारी यांच्यासोबत सुरू करू शकता. अशा खात्यांमुळे होणारा फायदा आणि व्यवहारातील सहजता आपण समजून घेणार आहोत.

आपल्या भारतीय लोकांमध्ये संयुक्त खाती असणारे माणसे मोठ्या संख्येने सापडतील. अर्थात, याचे कारण ही तितकेच महत्त्वाचे आहे. आपली भारतीय संस्कृती आणि त्यातील विश्वासार्हता त्यातून दिसून येते. आपल्या सारख्याच विश्वासू सहकाऱ्यांसोबत आपण जेव्हा पैशांची एकत्रितरीत्या बचत करत असतो. तेव्हा त्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ठरवलेली आर्थिक उद्दीष्ट्ये सहजरीत्या पूर्ण करू शकतो, असा विश्वास असतो. म्हणूनच भारतात संयुक्त खाती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला संयुक्त खाते, संयुक्त खात्यांचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे व तोटे सांगणार आहोत.

संयुक्त खाते (Joint Account) म्हणजे काय?

संयुक्त खाते हे बचत खाते असून ते दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्रितरीत्या चालवले जाते. संयुक्त खात्यातील सर्व खातेधारकांना खात्यातील रक्कम काढण्याची किंवा भरण्याची मुभा असते आणि ते सगळे जण याच्या संबंधित व्यवहार करू शकतात. संयुक्त खाती विशेषत: विवाहित जोडपी, जवळचे नातेवाईक आणि व्यावसायिक भागीदार काढतात.

संयुक्त खात्याचे फायदे

  1. संयुक्त खाते कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा व्यावसायिक भागीदारांसाठी अनेक प्रकारे फायद्याचे ठरू शकते.
  2. संयुक्त खात्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन गोष्टी विकत घेण्यासाठी एकत्रितरीत्या बचत करणे सोपे होते. यात सर्व जण एक ध्येयाने बचतीसाठी प्रयत्न करू शकतात.
  3. संयुक्त खात्यामुळे खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवणे सोपे होते.
  4. सर्व खातेधारक या खात्याद्वारे सुरू असलेल्या व्यवहारांवर देखरेख करू शकतात. त्यामुळे पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता कमी असते.
  5. नवरा बायको रोजच्या खर्चाची तरतूद म्हणून संयुक्त खाती सुरू करू शकतात. यामुळे दैनंदिन कामकाजाचा हिशोब ठेवणे सोपे जाते आणि खर्चावर नियंत्रण ही राहते.
  6. संयुक्त खात्यामुळे बॅंकेकडून आकरल्या जाणाऱ्या शुल्काची रक्कम कमी होण्यास मदत होते. प्रत्येक वैयक्तिक खात्यांवर आकारले जाणारे शुल्क संयुक्त खात्यामध्ये विभागले जाते.
  7. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास, संयुक्त खाते चालविण्यात कसलीही अडचण येत नाही. इथे खातेधारकाचे मृत्युपत्र असण्याची गरज नाही. संयुक्त खातेधारकाला त्या खात्यातून लगेच पैसे उपलब्ध होतात.
  8. कोरोना काळात वृद्धांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. पण त्याचवेळी काही प्रमाणात बाहेरील कामे ही  टाळता येण्यासारखी नव्हती. अशावेळी घरातील इतर सदस्य किंवा मुले संयुक्त खाते वापरू शकतात.

संयुक्त खात्याचे तोटे

  1. संयुक्त खात्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे काही प्रमाणात तोटे ही आहेत. 
  2. खात्यातील पैशांवर समान हक्क – संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा पैशांवर समान हक्क असतो. त्यामुळे काही खातेदारांकडून पैशांचा गैरवापर किंवा अफरातफर होण्याची शक्यता असते.
  3. कर्जाची सामायिक जबाबदारी – जेव्हा आपण एखाद्या सहकाऱ्यासोबत संयुक्त खाते सुरू करतो. तेव्हा खातेदारावरील कर्जाची जबाबदारी सुद्धा सामायिक होते. एखाद्या खातेदाराने कर्ज घेतले असेल आणि कारणांमुळे त्याला ते परत करता आले नाही, तर इतर खातेदारांच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
  4. आर्थिक गोपनीयता कमी होते - संयुक्त खाती असण्याचा तोटा असा की  खातेधारकाच्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दलची गोपनीयता कमी होते.

संयुक्त खात्याचे प्रकार

आपल्याकडील बॅंका विशिष्ट हेतुंसाठी आणि ग्राहकांच्या सुलभतेसाठी विविध प्रकारची संयुक्ती खाती सुरू करण्याची सुविधा देतात. इथे आपण बॅंकांद्वारे दिल्या जाणाऱ्या संयुक्त खात्याच्या प्रकारांची माहिती पाहणार आहोत.

एक (आयदर) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) – हा आपल्याकडे सर्वाधिक वापरला जाणारा खाते प्रकार आहे. फक्त दोन व्यक्ती आयदर किंवा सर्व्हायव्हर खाते सुरू करू शकतात. यातील एक खातेदार प्रायमरी तर दुसरा सेकंडरी असतो. हे दोघेही खात्याचा वापर करू शकतात. दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास जिवंत असलेल्या खातेदाराला या खात्यातील रक्कम मिळते. तसेच तो खातेदार हे खाते नियमित खाते म्हणून ही सुरू ठेवू शकतो.

कोणीही (एनीवन) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) – हे खाते एकल किंवा सर्व्हायव्हर खात्यासारखेच असते. फक्त इथे दोन पेक्षा अधिक लोक खाते सुरू आणि ऑपरेट ही करू शकतात. संपूर्ण कुटुंबासाठी किंवा दोनपेक्षा अधिक भागीदार असतील त्यांच्यासाठी या प्रकारचे खाते अत्यंत उपयुक्त आहे. खातेदारांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास, बाकीचे खातेदार खाते सुरू ठेवू शकतात. समजा सर्व खातेदारांचा मृत्यू झाला तर शेवटच्या खातेदाराला अंतिम शिल्लक रक्कम मिळते.

अगोदरचा (फॉर्मर) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) – हे खाते फक्त दोन व्यक्तींनाच सुरू करता येते. यातील एक जण प्रायमरी तर दुसरा सेकंडरी खातेदार असतो. यातील प्रायमरी खातेदारालाच व्यवहार करण्याचे अधिकार असतात. प्रायमरी खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर सेकंडरी खातेदाराला सर्व अधिकार हस्तांतरित होतात. तो सदर खाते बंद करू शकतो किंवा त्यातील सर्व पैसे काढू शकतो किंवा ते नियमित खाते म्हणून ही त्याचा वापर करू शकतो.

नंतरचा (लेटर) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) – हे खाते फॉर्मक किंवा सर्व्हायव्हर खात्यासारखेच असते. इथे फक्त प्रायमरी खातेदाराऐवजी सेकंडरी खातेदाराला पैशांचा व्यवहार करण्याचे अधिकार असतात. कालांतराने सेकंडरी खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर प्रायमरी खातेदाराकडे सर्व अधिकार हस्तांतरित होतात. तो त्याच्या इच्छेप्रमाणे ते खाते बंद करू शकतो किंवा नियमित खाते म्हणून सुरू ठेवू शकतो.

संयुक्त (जॉईंट) – इथे दोनपेक्षा अधिक सदस्य एकत्रितपणे खाते सुरू आणि ऑपरेट करू शकतात. या खात्यातून एखादा व्यवहार करायचा असल्यास सर्व खातेदारांना उपस्थित राहणे गरजेचे असते. इतर खातेदारांच्या संमतीशिवाय कोणीही वैयक्तिक खातेदार हे खाते ऑपरेट करू शकत नाही. अशा प्रकारची खाती विशेषकरून व्यावसायिक भागीदार वापरतात. यामुळे पैशांची अफरातफर आणि गैरवापर होण्याचा धोका कमी होतो.
संयुक्त (जॉईंट) किंवा उर्वरित (सर्व्हायव्हर) – हे खाते संयुक्त खात्यासारखेच आहे. इथे सर्व खातेदार एकत्रितरीत्या खाते ऑपरेट करू शकतात. खातेदारांपैकी एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास संपूर्ण खाते बंद होत नाही. इतर खातेदार खाते सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

18 वर्षांखालील बालकांचे (मायनर) खाते इथे प्रायमरी खातेदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर पालक सेकंडरी खातेदार म्हणून खाते ऑपरेट करू शकतात. हे कायद्याने बंधनकारक आहे. पालकांनी मुले 18 वर्षांची होईपर्यंत संयुक्त खाती सुरू ठेवली पाहिजे.
एकूणच, संयुक्त खाते उघडणे हे फायदेशीर आहे. पण वर नमूद केलेले सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपल्या सोयीनुसार संयुक्त खाती सुरु केली पाहिजेत जेणेकरुन भविष्यात होणारा त्रास टळेल.