Home Loan Insurance: प्रत्येक व्यक्ती थोडे थोडे पैसे जमा करून घर घेण्याचा विचार करत असते. तशी तरतूद झाली की बँक किंवा वित्तीय संस्थांची मदत घेऊन गृहकर्जाच्या(Home Loan) मदतीने स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते. एकदा का गृहकर्ज सुरु झालं की पगार आणि कर्जाचा हप्ता यांचा ताळमेळ घालणं अक्षरशः नाकीनऊ आणणारं असतं. अशातच घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कुटुंबीयांची असते. जर कुटुंबीय कर्जाची परतफेड करू शकले नाहीत तर घरं गमवण्याची वेळ येते. म्हणजेच वित्तीय संस्था किंवा बँका कर्जाची परतफेड करण्यासाठी घराचा लिलाव करतात आणि कर्जाची रक्कम त्यामधून वसूल करतात. पण अशा परिस्थितीत होम लोन इन्शुरन्स(Home Loan Insurance) असेल तर मदत होते. हाच इन्शुरन्स संकटकाळात कुटुंबीयाना आधार देतो, नेमका कसा ते जाणून घ्या.
'Home Loan Insurance' चे फायदे
होम लोन इन्शुरन्स(Home Loan Insurance) कर्जाच्या रक्कमेसाठी कर्जदाराला सुरक्षा प्रदान करते. बँकेकडून लोन घेतल्यानंतर होम लोन इन्शुरन्स ऑफर केला जातो. जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर कर्जाची रक्कम या इश्युरन्सच्या माध्यमातून भरण्यात येते. म्हणजेच कुटुंबीयांवर मृत्यूनंतर कोणताच दबाव येत नाही. याशिवाय खरेदी केलेल्या घरावर बँका आपला हक्क किंवा अधिकार बजावू शकत नाहीत.
'Home Loan Insurance' घ्यायचा की नाही?
होम लोन इन्शुरन्स(Home Loan Insurance) घेणं बंधनकारक नाही मात्र होम लोन इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. RBI ने होम लोन इन्शुरन्सबाबत कोणतीही गाईडलाईन जारी केलेली नाही. मात्र असं असलं तरीही कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी होम लोन इन्शुरन्स गरजेचा आहे. काही बँका होम लोन इन्शुरन्स घेणं बंधनकारक असल्याचे सांगतात मात्र तसा नियम कुठेही करण्यात आलेला नाही. त्यामुळे होम लोन इन्शुरन्स घ्यायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असणार आहे.
'Home Loan Insurance' तुम्ही EMI द्वारे भरू शकता
होम लोन इन्शुरन्सचा प्रीमियम एकूण कर्जाच्या 2 ते 3 टक्के इतकाच असतो. लोन घेताना तुम्ही एकरकमी ही रक्कम भरू शकता किंवा ही रक्कम EMI स्वरूपातही भरू शकता. म्हणजेच होम लोनच्या हफ्तासारखा होम लोन इन्शुरन्सचा EMI ही भरला जाऊ शकतो. हा EMI तुलनेने फारच कमी असतो.