मुंबई : आजच्या काळात जोडपं एकत्र सुख-दुःख वाटून घेतं, मग विम्याचं संरक्षण का नाही? पोस्टल लाइफ इन्शुरन्सने (PLI) अशीच एक आकर्षक योजना सादर केली आहे — ‘युगल सुरक्षा योजना’ (Yugal Suraksha Policy). ही पॉलिसी विवाहित जोडप्यांना एकाच पॉलिसीत विमा संरक्षण देणारी भारतातील एकमेव योजना आहे.
या योजनेअंतर्गत पती-पत्नी दोघेही एका पॉलिसीत कव्हर होतात आणि 20,000 रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम निवडण्याची मुभा मिळते. सर्वात खास बाब म्हणजे, ही योजना केंद्र सरकारकडून संरक्षित आहे आणि मुदतपूर्तीनंतर आकर्षक बोनससह परतावा दिला जातो.
‘युगल सुरक्षा योजना’चा लाभ केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, निम-सरकारी संस्था, बँक कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आणि अन्य व्यावसायिक घेऊ शकतात. पॉलिसी घेताना दोघांपैकी किमान एकाचे वय 21 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
या पॉलिसीत 5 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी संरक्षण मिळते. तीन वर्षांनंतर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. दुर्दैवाने, पती-पत्नीपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यास, उर्वरित जोडीदाराला विमा रक्कम आणि बोनसचा लाभ मिळतो. सध्या प्रति 1,000 रुपयांवर वार्षिक 58 रुपयांचा बोनस मिळतो.
उदाहरणार्थ, एखाद्या दाम्पत्याने 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर 20 वर्षांच्या शेवटी त्यांना 10 लाख मूळ विमा रक्कम आणि सुमारे 10.40 लाखांचा बोनस मिळून एकूण 20.40 लाखांचा परतावा मिळू शकतो. म्हणजेच, कमी प्रीमियममध्ये दीर्घकालीन ‘डबल बेनिफिट’ मिळण्याची हमी ही योजना देते.
तज्ज्ञांच्या मते, ही पॉलिसी विमा आणि बचत यांचा उत्तम संगम ठरू शकते — "प्रेम आणि संरक्षण दोन्ही एका पॉलिसीत" हे या योजनेचं खरे वैशिष्ट्य मानलं जातं.