Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Options for Women: टॅक्स बचतीचे विविध पर्याय वापरा आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Tax-Saving Options for Women

Tax-Saving Options for Women: इन्कम टॅक्स कायद्यामध्ये टॅक्स सवलत आणि वजावटीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या तरतुदींचा आधार घेऊन महिला त्यांचे आर्थिक भविष्य नक्कीच सुरक्षित करू शकतात.

Tax-Saving Options for Women: पुरुषांबरोबरच महिलाही आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्याही आता पुरुषांच्या बरोबरीने पगार घेत आहेत. पगार आला की, त्यावर नियमाप्रमाणे सरकारला टॅक्स हा भरावाच लागतो. पण ज्यांचे उत्पन्न करपात्र नाही. त्यांना काहीच चिंता नाही. पण ज्या महिलांचे उत्पन्न कर सवलतीपेक्षा जास्त आहे. अशा महिलांनी टॅक्स लागू नये, म्हणून कर सवलतीच्या विविध पर्यायांचा लाभ घेतला पाहिजे. तसे पाहायला गेले तर टॅक्स ही कॉमन गोष्ट आहे. म्हणजे यामध्ये स्त्रियांना वेगळी तरतूद आणि पुरुषांना वेगळी, अशी काही सोय नाही. पूर्वी म्हणजे 2012-13 पर्यंतच्या काळात तशी सोय होती. स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब (Tax Slab) होते. पण तो नियम आता रद्द केला असून स्त्री-पुरुषांसाठी समान टॅक्स स्लॅब ठेवण्यात आले आहेत.

नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलेला तिची आर्थिक बाजू सांभाळून टॅक्स बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स (Income Tax) कायद्यात उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार कर सवलती आणि कर वजावटीबद्दल माहिती असायला हवी. तसे पाहायला गेले तर महिलांचे सेव्हिंग स्किल सर्वश्रूत आहे. त्या यामध्ये पहिल्यापासून माहिर आहेत. पण इन्कम टॅक्स कायद्यात होत असलेले बदल, त्यातील तरतुदीनुसार अधिकाधिक लाभ घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण महिलांसाठी उपलब्ध असलेल्या अशाच कर सवलतीच्या पर्यायांबद्द्ल जाणून घेणार आहोत.

होम लोन रिपेमेंट (Home Loan Repayment)

पती-पत्नी दोघांनी जॉईंट होम लोन घेतले असेल तर ते दोघेही कर्जाची मूळ रक्कम आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा कर सवलतीसाठी वापर करू शकतात. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर्जाची मूळ रकमेवर 1.5 लाख आणि त्यावरील व्याजावर कलम 24 अंतर्गत 2 लाखापर्यंत वजावट घेऊ शकतात. 

त्याचबरोबर एखाद्याने प्रथमच घर खरेदी केले असेल आणि होम लोनचे कर्ज 35 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच घराची किंमत 50 लाखापेक्षा कमी असेल, तर सेक्शन 80EE अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपयांचा किंवा सेक्शन 80EEA अंतर्गत व्याजावरील रकमेवर 1.50 लाखापर्यंत लाभ घेता येऊ शकतो.

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80TTA अंतर्गत बचत खात्यावरील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर 10 हजार रुपयांपर्यंत कर वजावट मिळते. तसेच ज्येष्ठ महिला नागरिकांना कलम 80TTB अंतर्गत मुदत ठेवी आणि बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याजरूपात मिळणाऱ्या 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळते.

घर भाडे भत्ता (House Rent Allowance)

घर भाडे भत्ता हा प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगारामध्ये समाविष्ट असतो. त्यानुसार तुम्ही घराचे भाडे भरत असाल तर तुम्हाला त्याचा कर सवलतीसाठी लाभ घेता येतो.

शैक्षणिक कर्ज (Educational Loan)

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80E द्वारे तुम्ही उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर त्यातील व्याजाच्या भागावर कर सवलत मिळते.

हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance)

सेक्शन 80D मधील तरतुदीनुसार हेल्थ इन्शुरन्ससाठी भरल्या जाणाऱ्या प्रीमिअमवर महिला 25,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळवू शकतात. तसेच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्यास त्यावर 50,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते. यामध्ये 50 हजारांपर्यंतचा खर्च दाखवून सवलत मिळवता येऊ शकते.

टॅक्स बचतीचे इतर पर्याय

वरील पर्यायांव्यतिरिक्त इतरही अनेक मार्ग आहेत. जसे की, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, इक्विटी लिंक सेव्हिंग स्किम, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, युलिप आणि राष्ट्रीय पेन्शन स्कीम इत्यादीद्वारे पगारदार महिला वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवून टॅक्स सवलत मिळवू शकतात.