“शिक्षण पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष जमा केलेले दीड लाख रुपये फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये गेले. नफा होईल या आशेने मित्रांकडूनही 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, तेही ट्रेडिंगमध्ये गमावले.’’
F&O ट्रेडिंगमध्ये लाखो रुपये गमावलेला 25 वर्षीय अभी स्वतःच्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगतो. मात्र, फ्यूचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होणारा अभी हा काही एकमेव तरूण नाही. त्याच्यासारखे शेकडो तरूण शेअर मार्केटच्या नादात लाखो रुपये गमावत आहेत.
कमी गुंतवणूक, जास्त नफा व झटपट फायद्याच्या नादात F&O ट्रेडिंग करणाऱ्यांचा आकडा गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढला आहे. मात्र, झटपट पैसा कमवण्याच्या नादात तरूणवर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. सेबीपासून ते आरबीआयपर्यंत देशातील प्रमुख वित्तीय संस्थांकडून F&O मध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, यामध्ये पैसा गुंतवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
अनेकजण जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या नादात आयुष्यभराची बचत F&O ट्रेडिंगमध्ये लावत आहेत. जो पैसा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला गेला असतो, तो ट्रेडिंगमध्ये लावला जात आहे. एवढेच नाही तर बचत गमवल्यानंतर कर्ज काढून ट्रेडिंग केली जात आहे.
किरकोळ गुंतवणुकदारांच्या संख्येत मोठी वाढ
कोरोना व्हायरस महामारीमुळे भारतासह जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले. मात्र, या संकटातही शेअर मार्केटच्या माध्यमातून अनेकसाठी संधी निर्माण झाली. अनेकांना F&O ट्रेडिंगच्या माध्यमातून कमाईचा नवीन मार्ग सापडला. मात्र, अनेकांना सुरुवातीला झालेल्या नफ्याच्या तुलनेत पुढे जाऊन कितीतरी अधिक पटींनी नुकसान झाले.
वर्ष 2020 नंतर भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांचा आकडा देखील वाढला आहे. तंत्रज्ञानाचा वापर, डिस्काउंट ब्रोकर, स्मार्टफोनच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झालेले गुंतवणुकीचे पर्याय यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. एनएसईच्या डेटानुसार 2019 ते 2023 या 5 वर्षांच्या काळात जवळपास 12 कोटी नवीन गुंतवणूकदार शेअर मार्केटशी जोडले गेले आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एनएसईच्या इंडेक्स डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये 92.5 लाख व्यक्ती आणि प्रोप्रायटर फर्म्सने व्यवहार केले. यांना झालेल्या नुकसानीचा आकडा तब्बल 51,689 कोटी रुपये आहे.
Futures Industry Association नुसार, जून 2024 पर्यंत जगभरात 98.06 अब्ज F&O कॉन्ट्रॅक्ट्सचे व्यवहार पार पडले. यापैकी एकट्या भारतातील व्यवहारांची संख्या तब्बल 74.2 अब्ज एवढी आहे. म्हणजेच, एकूण व्यवहारांपैकी 75.7 टक्के. तर केवळ जून 2024 मध्ये 16.94 अब्ज F&O कॉन्ट्रॅक्ट्सचे व्यवहार पूर्ण झाले. त्यापैकी तब्बल 10.34 अब्ज व्यवहार केवळ भारतात पार पडले. या आकडेवारीवरूनच भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांचा F&O ट्रेडिंगमध्ये वाढता सहभाग दिसून येतो. मात्र, F&O ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबरोबरच दुसरीकडे यामुळे कर्जाच्या खाईत अडकणाऱ्यांचा आकडा देखील वाढत चालला आहे.
10 पैकी 9 जणांचे नुकसानीचे कारण काय?
भारतातील लाखो गुंतवणूकदार डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु, यातील बहुतांशजणांना तोटा सहन करावा लागतो. सेबीच्या रिपोर्टनुसार, F&O मध्ये ट्रेडिंग करणाऱ्या 10 पैकी 9 जणांना तोटा होत आहे. विशेष म्हणजे यातील 84 टक्के पुरूष आहेत, तर 75 टक्के जणांचे वय हे 40 वर्षांपेक्षा कमी आहे.
अनेकजण मेहनतीची कमाई F&O मध्ये ट्रेडिंगमध्ये गुंतवत आहेत. मात्र, यामध्ये नुकसान सहन करावे लागते. नुकसान भरून काढण्यासाठी इतरांकडून कर्ज देखील काढतात. F&O मध्ये ट्रेडिंगमध्ये नुकसान होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अनुभव नसणे. अनेकजण ऐकीव माहितीच्या आधारावर या बाजारात उडी घेतात. कोणतेही ज्ञान व अनुभव नसताना गुंतवणूक करतात. यामुळे नुकसान सहन करावे लागते.
याशिवाय मार्केटमध्ये अचानक होणारा चढउतार, चुकीची स्ट्रॅटजी व पैशांचे चुकीचे व्यवस्थापन ही देखील F&O मध्ये ट्रेडिंगमध्ये नुकसान होण्याची प्रमुख कारणे आहे. प्रामुख्याने ऑप्शन बाइिंगमध्ये गुंतवणूकदाराला नुकसान होते. मात्र, कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याच्या नादात अनेकजण नुकसान करून घेतात.
नुकसानीबाबत तज्ञांनी व्यक्त केली चिंता
F&O ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना होणाऱ्या नुकसानीबाबत तज्ञांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआय आणि सेबीने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
फ्यूचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग सेगमेंटमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांचा सहभाग वाढला आहे. मात्र, हे क्षेत्र जोखीमपूर्ण आहे. त्यामुळे सावधगिरी न बाळगल्यास कौटुंबिक गुंतवणुकीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकते, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.
सेबीकडून देखील किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. विकली एक्सपायरीमध्ये बदल, कमी लॉट साइज, ऑप्शन्स स्ट्राइक्समध्ये बदल, इंट्राडे मर्यादा असे अनेक बदल सेबीकडून करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरीही F&O ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढतच चालला आहे.
सरकारकडून देखील वारंवार याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून F&O ट्रेडिंग व्यवहारांवरील करात वाढ करण्यात आली आहे. याआधी फ्यूचर्स वर 0.01 टक्के आणि ऑप्शन्सवर 0.062 टक्के सिक्यूरिटीज ट्रँझॅक्शन टॅक्स (STT) लागत असे. मात्र, आता यावर अनुक्रम 0.02 टक्के आणि 0.1 टक्के एसटीटी आकारला जाईल. सरकारलाही एसटीटीमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे F&O ट्रेडिंगबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्याची शक्यता कमी आहे.
F&O ट्रेडिंग नुकसान टाळण्यासाठी काय करायला हवे?
F&O ट्रेडिंग 10 पैकी 9 जणांचे नुकसान होते. तुम्ही देखील या 9 ट्रेडर्सपैकीच एक असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, योग्य रणनिती वापरून तुम्ही नुकसान टाळू शकता.
शेअर मार्केट समजून घ्या | शेअर मार्केटमध्ये उतरण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. केवळ कोणीतरी सांगितले अथवा मित्राने केले म्हणून मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय योग्य नाही. F&O मार्केट कसे काम करते, ट्रेंड्स काय आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स, प्रीमियम काय असतात? याविषयी अधिक जाणून घ्या. अनेकजण कोणताही अनुभव नसताना, कोणतेही ज्ञान नसताना मार्केटमध्ये पैसे लावतात. कोणतीही माहिती न घेता गुंतवणूक करणाऱ्यांनाच सर्वाधिक नुकसान होते. त्यामुळे सर्वातआधी शेअर मार्केटविषयी जाणून घ्यायला हवा. |
जोखीम मर्यादा | तुम्ही किती नुकसान सहन करू शकता, हे स्वतःला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकजण नुकसान भरून काढण्यासाठी अधिकाधिक पैसा लावतात व यामुळे जास्तच नुकसान होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकूण भांडवलापैकी केवळ 20 ते 30 टक्के रक्कमेवरच जोखीम स्विकारायला हवी. संपूर्ण रक्कम F&O मार्केटमध्ये गमावल्यास कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे F&O ट्रेडिंग करताना सावधगिरी बाळगायला हवी. |
संयम व भावना | F&O ट्रेडिंग करताना जेवढा अधिक पैसा लावू, तेवढा अधिक नफा होईल, असा समज अनेकांचा असतो. मात्र, F&O ट्रेडिंग लॉटरी नाही. हे संपूर्णपणे मार्केटमधील घडामोडीवर अवलंबून असते. झटपट श्रीमंत होण्याचा विचार सोडून मार्केटमधून पैसा कमविण्यासाठी सयंम बाळगायला हवा. अनेकजण F&O ट्रेडिंग करताना भावनांवर नियंत्रण ठेवत नाही व यामुळे अधिकाधिक नुकसान होते. F&O ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचे असल्यास संयम बाळगणे व भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. |
स्टॉप लॉस | F&O ट्रेडिंगमध्ये नुकसान टाळण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्टॉल लॉसचे पालन करणे. स्टॉप लॉस लागल्यास मार्केटमधून बाहेर पडणे कधीही चांगले. यामुळे तुमचे नुकसान कमी होते. त्यामुळे कधीही स्टॉप लॉसचे पालन करणे उत्तम. |
पोर्टफोलियोमध्ये विविधता | संपूर्ण गुंतवणूक एकाच ठिकाणी करणे हे योग्य धोरण नाही. तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, पीपीएफ, सोने यामध्ये तुमची गुंतवणूक विभागू शकता व उर्वरित रक्कमेचा वापर F&O ट्रेडिंगसाठी करता येईल. |
अल्गो ट्रेडिंग | शेअर मार्केटमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही अल्गो ट्रेडिंगची मदत घेऊ शकता. लोकांच्या निर्णय क्षमतेवर अवलंबून राहण्याऐवजी थेट ऑटोमेटिक मशिन्स/एआयच्या मदतीने ट्रेडिंग करू शकता. अल्गो ट्रेडिंगने केवळ फायदाच होत असे नाही. मात्र, यात होणारे नुकसान हे अनेक पटींनी कमी असते. मात्र, अल्गो ट्रेडिंग किरकोळ गुंतवणूकदारांना परवडणारे नाही. |
गुंतवणुकीचे इतर सुरक्षित पर्याय
झटपट पैसे कमवण्याऐवजी सुरक्षित परतावा मिळवण्याकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही फ्युचर्स अँड ऑप्शन्समधून एका दिवसात किती नफा कमवू शकता, याला कोणतीही मर्यादा नाही. परंतु, यात नुकसान होण्याची शक्यता जवळपास 90 टक्के असते. त्यामुळे इतर सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणे कधीही फायद्याचे ठरते. F&O व्यतिरिक्त कशात गुंतवणूक करून नफा कमवू शकता, याबाबत जाणून घेऊया.
शेअर्स | तुम्ही जर शेअर मार्केटमधील F&O व्यतिरिक्त इतर गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. यातील गुंतवणूक देखील जोखमीची असली तरीही F&O च्या तुलनेत नुकसान होण्याची शक्यता कमी असते. या गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी सयंम बाळगणे अधिक गरजेचे आहे. तुम्ही जेवढे अधिक दिवस गुंतवणूक कायम ठेवाल, तेवढा अधिक नफा होण्याची शक्यता असते. मात्र, कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी. अनेक कंपन्या शेअर्सवर लाभांश देखील देतात. तुम्ही चांगल्या कंपन्यांच्या आयपीओमध्येही गुंतवणूक करू शकता. |
म्युच्युअल फंड | म्युच्युअल फंड देखील इक्विटीचाच एक प्रकार आहे. यातील गुंतवणूक ही शेअर्स आणि F&O च्या तुलनेत अधिक सुरक्षित मानली जाते. विशेष म्हणजे तुम्ही 500 रुपयांपासून यात गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. यामधील गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे याची कोणतीही मुदत नसते. F&O मध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टच्या समाप्तीची एक तारीख असते. मात्र, म्युच्युअल फंड आणि शेअर्स कितीही कालावधीपर्यंत राखून ठेवू शकता. |
कमोडिटीज | मागील काही वर्षात F&O प्रमाणेच कमोडिटीज ट्रेडिंग देखील भारतात लोकप्रिय झाले आहे. तुम्ही कमोडिटीज मार्केट अंतर्गत क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, अल्यूमिनियम, सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र, यातील गुंतवणूक देखील जोखमीची असते. |
रिअल इस्टेट | रिअल इस्टेट हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. जर तुमची जास्त गुंतवणुकीची क्षमता असेल, तर या सुरक्षित पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. |
पीपीएफ व पेन्शन योजना | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व सरकारी पेन्शन योजना हा देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. निवृत्तीनंतर आरामात आयुष्य घालवायचे असल्यास या योजनांमध्ये गुंतवणूक करणे कधीही चांगले. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असते व निवृत्तीनंतर दरमहा पैसे देखील मिळतात. |
सोने | सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग शोधत असाल तर सोने हा चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी ठराविक भाग सोन्यात गुंतवू शकता. डिजिटल सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे देखील खरेदी करू शकता. यात नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते व गरज असेल तेव्हा त्वरित विक्री देखील करता येते. |
लक्षात ठेवा की, कोणत्याही गुंतवणुकीतून नफा मिळवणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये लाखो रुपयांचा परतावा कोणत्याही गुंतवणुकीतून मिळत नाही. F&O हा झटपट पैसे कमवण्याचा मार्ग असला तरीही किरकोळ गुंतवणुकदारांसाठी हा योग्य पर्याय नाही. यात नुकसान होण्याचीच शक्यता असते. त्यामुळे गुंतवणुकीच्या इतर मार्गांचाही विचार करायला हवा. तुम्ही योग्य स्ट्रॅटजी व अचूक निर्णय घेऊन इतर गुंतवणुकीतून नक्कीच जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता.