केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसंदर्भात (NPS) महत्त्वाची घोषणा केली होती. एनपीएसमधील नियोक्त्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानात बदल करण्यात आला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पाहायला मिळू शकतो. तुमच्या पगारातीलही काही रक्कम एनपीएसमध्ये जमा होत असल्यास या प्रणालीमध्ये नक्की काय बदल झाले आहेत, ते जाणून घ्यायला हवे.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) काय आहे?
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) ही एक निवृत्ती योजना आहे. ही निवृत्ती योजना बाजाराशी जोडलेली असून, सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध होती. मात्र, वर्ष 2009 मध्ये सरकारने या प्रणालीमध्ये बदल करत खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही देखील ही प्रणाली सुरू केली.
खासगी कर्मचाऱ्यांमध्ये ही प्रणाली विशेष लोकप्रिय आहे. 6 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी या योजनेचा फायदा घेत आहेत. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण या योजनेचे नियामक म्हणून कार्य करते.
या अंतर्गत टियर-1 निवृत्ती खाते आणि टियर-2 ऐच्छिक खाते उघडले जाते. कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठराविक रक्कम या खात्यांमध्ये दरमहा जमा होते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्या या खात्यातून 60 टक्के रक्कम एकावेळी काढू शकतात. तर उर्वरित 40 टक्के रक्कमेचा पेन्शन म्हणून लाभ घेता येईल. याशिवाय, आयकरात देखील याचा फायदा मिळतो.
एनपीएसमध्ये काय बदल झाले आहेत?
अर्थसंकल्पामध्ये एनपीएसमधील योगदानामध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत एनपीएसमध्ये कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांच्या पगारातील 10 टक्के रक्कम कपात करून जमा केली जात असे. मात्र, आता कंपनीद्वारे 14 टक्के योगदान दिले जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा नियम आधीच लागू होता. आता खासगी कर्मचाऱ्यांसाठीही हा नियम लागू असेल. तसेच, केवळ नवीन कर प्रणालींतर्गतच याचा फायदा मिळेल. जुन्या करप्रणालीचाच लाभ घेतल्यास कंपनीद्वारे 10 टक्केच योगदान दिले जाईल.
एनपीएसमधील योगदानामुळे तुमच्या पगारावर काय परिणाम होणार?
एनपीएसमधील बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होईल. याआधी कर्मचाऱ्याच्या पगारातील 10 टक्के रक्कम कपात होत असे. मात्र, आता एनपीएसमध्ये पगारातील 14 टक्के रक्कम जमा होईल.
समजा, तुमचा पगार 30 हजार रुपये आहे. अशावेळी 10 टक्के योगदानानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून 3 हजार रुपये जमा होत असे. मात्र, आता 14 टक्के कपातीमुळे 4,200 रुपये जमा होतील.
4 टक्के अतिरिक्त कपातीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होत असला तरीही भविष्यात मात्र फायदा होईल. कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या काळात एनपीएस खात्यात अतिरिक्त पैसे जमा होतील. ज्याचा फायदा निवृत्तीनंतर होईल.