• 28 Nov, 2022 16:27

SIP Fund Total AUM : SIP फंडांमधील गुंतवणुकीने मोडला आजवरचा रेकॉर्ड

SIP, Mutual Fund Investment, SIP Funds AUM, AMFI

SIP Fund Total AUM : किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतणुकीचा ओघ वाढला आहे. थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांत SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. ज्यामुळे SIP मधील एकूण गुंतवणूक रेकॉर्ड पातळीपर्यंत वाढली आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठीचा सर्वात सोपा मार्ग SIP हा गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. नियोजनबद्ध गुंतवणूक पर्याय अर्थात SIP फंडांमधील एकूण गुंतवणूक तब्बल 6.6 लाख कोटी इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. SIP फंडाची आजवरची ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. (SIP Funds AUM on Record Level)

अॅम्फी या संस्थेने SIP फंडांमधील गुंतवणुकीचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार SIP मधून ऑक्टोबर 2022 पर्यंत 6.6 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी मागील 12 महिन्यात SIP मधून 1.4 लाख कोटींची गुंतवणूक झाली.

SIP मधून दर महिन्याला सरासरी 13000 कोटींची गुंतवणूक केली जात आहे. ज्यातील 90% निधी हा इक्विटीशी संबधित योजनांमध्ये गुंतवणूक केला जात आहे. अॅम्फीच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2022 मध्ये SIP मधून सरासरी 2198 रुपयांची गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे.

म्युच्युअल फंडांकडील एकूण संपत्तीच्या तुलनेत SIP चा हिस्सा वाढला असून तो 16.8% झाला आहे. मागील पाच वर्षांत SIP शी संलग्न फंडांची 28.8% ने वृद्धी झाली आहे.मागील पाच वर्षांत SIP शी निगडीत फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी 5.3 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. याच कालावधीत म्युच्युअल फंड उद्योगाची 13% दराने वृद्धी झाली असून 39.1 लाख कोटींची AUM आहे.

SIP खाते सुरु करुन त्यामाध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. दर महिन्याता 10.8 लाख SIP खाती सुरु होत असल्याचे अॅम्फीच्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे.ऑक्टोबर 2022 अखेर एकूण 5.9 कोटी SIP खाती सुरु आहेत. 

एसआयपी म्हणजे काय?

एसआयपी म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. एसआयपीचा फुलफॉर्म सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) असा आहे. एसआयपी ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे; ज्याद्वारे गुंतवणुकदार नियमित  गुंतवणूक करू शकतो.