गेल्या काही वर्षांत आरोग्य सुविधांच्या बाबतीत भारताने प्रचंड प्रगती केली आहे. त्यामुळे लोकांचे आर्युमान वाढले आहे. आपल्या देशात उतारवयासाठी खूपच कमी लोक बचत करतात. त्यामुळे उतरत्या वयात लोकांना उपचाराच्या योग्य सुविधा मिळाव्यात, त्यांना प्रवास करताना खर्च कमी यावा यासाठी भारत सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ ज्येष्ठ नागरिक कार्डचा (Senior Citizen Card) वापर करून घेता येतो. आज आपण ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.
कर लाभ
वयाच्या 60 वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या डोक्यावर कमीतकमी आर्थिक भार असावा यासाठी त्यांना कर भरताना काही सवलती देण्यात आल्या आहेत. आयकर विभागाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांना 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. तर 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर ज्येष्ठ नागरिकांना 10 टक्के, 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 10 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास 30 टक्के कर ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागतो. त्याचबरोबर 80D अंतर्गतदेखील त्यांना सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य विमा काढला असेल तर त्या विम्याच्या हफ्त्यावर ही कर लाभ मिळतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला असल्यास त्यांना कर भरताना 50 हजार रुपयांची सूट मिळते.
विमानाच्या तिकिटांमध्ये सवलत
भारतातील ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडिया विमान कंपनीमधून प्रवास केल्यास इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर सवलत मिळते. ही सवलत तिकिटाच्या मूळ भाड्यावर (basic fare) 50 टक्के इतकी असते. भारताअंतर्गत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा दिली जाते. तर जेट एअरवेजमध्ये इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर 65 वर्षांवरील नागरिकांना 8 टक्के सूट मिळते.
रेल्वे तिकिटांत प्राधान्य व सूट
भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटावर 5 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. तसेच तिकिट बुकिंगमध्येही वृद्ध नागरिकांना प्राधान्य दिले जाते. दरम्यान, कोरोना काळात ही सवलत रेल्वेकडून बंद करण्यात आली. या काळात रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही सुविधा अजून काही काळ बंद राहाणार असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
बँकिंग सेवेत प्राधान्य
भारतातील बऱ्याच बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष खाती, गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर, नाविन्यपूर्ण योजना तसेच बँकेच्या शाखेत ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांच्यासाठी वेगळ्या रांगा ही असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी Senior Citizen Saving Scheme बनवण्यात आली असून या स्कीमद्वारे गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 8.4 टक्के व्याज दिले जाते. तसेच त्यांना बँकेतील मुदत ठेवीवर इतरांपेक्षा 0.5 टक्के अधिक व्याजदर दिला जातो.
न्यायालयीन सुनावणीत प्राधान्य
ज्येष्ठ नागरिक न्यायालयीन कामकाजाच्या बाबतीत न्यायालयाला पत्र लिहून त्यांच्या सुनावणीला प्राधान्य देण्याबाबत विनंती करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीनुसार न्यायालय त्यांच्या सुनावण्या जलद घेते किंवा त्यांना प्राधान्य देते.
विविध सुविधा
रुग्णालयांमध्ये ही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगा असतात. रजिस्ट्रेशन व आरोग्य तपासणी यातही त्यांना प्राधान्य दिले जाते. 60 वर्षांवरील नागरिकांचा राष्ट्रीय विमा अंतर्गत वरिष्ठ आरोग्य विमा काढण्यात येतो. याविम्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 1 लाख रुपये तर गंभीर आजारासाठी 2 लाख रुपयांचे संरक्षण मिळते. वरिष्ठ विमा योजनेत ज्येष्ठ नागरिक 7.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्यावर त्यांना 8 टक्के व्याज मिळते. तसेच या गुंतवलेल्या पैशांमधून प्रत्येक महिन्याला किंवा 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा पेन्शन मिळू शकते.
पासपोर्ट
ज्येष्ठ नागरिकांना पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेतही सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाचा किंवा मुलीच्या पासपोर्टची झेरॉक्स प्रत दाखवून, तसेच सदर मुले परदेशात शिकत असल्यास त्याचा पुरावा सादर करून त्यांना पासपोर्ट मिळणे सोपे जाते.
अशाप्रकारे भारतातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून व काही खासगी कंपन्यांकडून विशेष सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सरकारने प्रमाणित केलेले ज्येष्ठ नागरिकत्वाचे ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र कसे काढायचे याची सविस्तर माहिती येथे दिली आहे. याचा अवलंब करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढू शकता व तुम्हाला मिळणाऱ्या विविध सुविधांचा आनंद घेऊ शकता.