महाराष्ट्र सरकारद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एक वयोश्री योजना आहे. 65 वर्षांवरील नागरिकांना वयोमानानुसार होणारे आजार, आवश्यक उपकरणे खरेदी करणे व दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तुम्हाला वयोश्री योजनेचा लाभ कसा मिळू शकतो? यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे? याविषयी सविस्तर जाणून घ्या.
महाराष्ट्र सरकारची वयोश्री योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा मूळ उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.
या योजनेंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले जातील. या रक्कमेचा वापर ज्येष्ठ नागरिक आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी करू शकतील. याशिवाय, दैनंदिन गरजा, व्यायाम केंद्र, योगा, मानसिक स्वास्थ केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी ही रक्कम वापरता येईल. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी देखील केली जाईल.
वयोश्री योजनेची पात्रता
65 वर्षांवरील कोणतीही वयोवृद्ध व्यक्ती वयोश्री योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेसाठी प्रमुख पात्रता म्हणजे लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये कमी असायला हवे. याशिवाय, अशा व्यक्तींकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आधार कार्ड नसल्यास इतर ओळखपत्राचाही वापर करता येईल.
सरकारच्या बीपीएल रेशन कार्ड, इंदिरा गाांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्यास त्याची माहिती द्यायला हवी.
वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड/मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वयं-घोषणापत्र
- राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याचा पुरावा
- उत्पन्न पुरावा
- रेशन कार्ड
- वीज बिल
वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?
अद्याप वयोश्री योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरून जवळील ग्रामपंचायतीमध्ये जमा करू शकतात. याशिवाय, सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-71 या कार्यालयातही अर्ज करता येईल.
अर्ज केल्यानंतर नोडल एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले जातील.