SBI hikes FD Rates : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडक मुदतपूर्ती कालावधीसाठी एफडीच्या दरात वाढ केली आहे. 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या रिटेल एफडीवर नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू असणार आहेत. एसबीआयने या आधी 22 ऑक्टोबरला बदल केले होते.
आता असे असतील SBI FD Rates
आता 7 ते 45 दिवसांसाठी एफडीवर 3 टक्के इतके व्याज मिळेल. 46 दिवसापासून ते 179 दिवसापर्यंत 3.9 टक्के, 180 ते 210 दिवसासाठी 5.25 टक्के, 211 दिवस ते 1 वर्ष मुदतपूर्ती असणाऱ्या कालावधीसाठी 5.75 टक्के व्याज मिळेल. 1 ते 3 वर्ष या कालावधीसाठी 6.75 टक्के इतका मुदतपूर्ती ठेवीवरील (एफडी) व्याजाचा दर राहील. यापुढील कालावधीसाठी 6.25 टक्के इतका व्याजाचा दर राहील.
गेल्या काही दिवसांपासून एफडीवरील दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध होत आहेत. यापूर्वी यूको बँकेनेही आपल्या एफडी दरात वाढ केली होती. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर एफडी दरांमध्ये घट होत आहे. यामुळे सुरक्षित परताव्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये यात गुंतवणूक करण्याचा तुलनेने कमी उत्साह होता. मात्र आता दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
स्मॉल फायनान्स बँकाही अधिक व्याजदर ग्राहकांना ऑफर करताना दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दरात नुकतीच वाढ केली. यानंतर बँकांची कर्जे महाग होऊ लागली आहेत. दुसरीकडे एफडी (मुदत ठेव) मधील दरांमध्ये बँका वाढ करताना दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळवता येणार आहे.
सुरक्षित परतव्यासाठी एफडीचा पर्याय लोकप्रिय
गुंतवणूकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. पण, सुरक्षित परताव्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये एफडी हा लोकप्रिय पर्याय असतो. मुच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये मिळणाऱ्या रिटर्नइतके नाही मिळाले तरी एकवेळ ठीक पण जोखीमरहित आणि विशिष्ट कालावधीनंतर आपल्या पैशात वाढ व्हावी असा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांचीही मोठी संख्या असते. अशांसाठी बँकांचे वाढणारे एफडीवरील व्याजदर हे दिलासादायक ठरत आहेत.