Women's Employment: ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवा म्हणून सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात सर्वसाधारण कुटुंबातील महिला शेतीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. पण, उन्हाळ्यात शेतीची कामे बंद असल्याने त्यांना दुसऱ्या रोजगाराची गरज भासते. अशावेळी ते सरकारी रोजगार योजनांचा लाभ घेऊ शकतात. ज्यातून त्यांचा त्याकाळातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकतो.
Table of contents [Show]
महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. नव तेजस्विनी योजनेला 8 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नव तेजस्विनी योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय (WCD) द्वारे लागू केली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सरकार ठिकठिकाणी नागरी आणि जनजागृती मोहीम राबवत आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांचे कौशल्य विकसित करून त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो.
महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेचे फायदे
महाराष्ट्रात ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवली जाते. या योजनेतून राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 10 लाख कुटुंबांना लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत महिलांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यासाठी शासन आर्थिक मदत करत आहे. महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजनेमुळे ग्रामीण महिला उद्योजकतेला प्रोत्साहन मिळत आहे.

रोजगार हमी योजना
ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र रोजगार हमी योजना (Maharashtra Rojagar Hami Yogana) सुरू केली आहे. या योजनेतून वर्षभरात किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचे वेतन दर केंद्र सरकार ठरवते बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1977 मध्ये रोजगार हमी कायदा लागू केला होता. या कायद्यामध्ये दोन योजनांचा समावेश आहे, त्यापैकी एक महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे. हा कार्यक्रम नंतर 2008 मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी कायद्याच्या नावाखाली संपूर्ण देशभर राबवला जात आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना 2023 चे उद्दिष्ट
ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना लाभार्थ्यांना दरवर्षी 100 दिवस कामाची हमी देते. या योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या मदतीने उपलब्ध करून दिली जातात. ही योजना विशेषत: ज्या कुटुंबांना उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नाहीत त्यांना उत्पन्न मिळवून देणारी एक आश्वाशित योजना आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केली. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यात केली जात आहे. महाराष्ट्रातील 71 लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
याकरीता समुदाय संघटन, संस्थांची निर्मिती, विविध पथदर्शी प्रकल्प, स्वयंसेवी व शासकीय तसेच खाजगी संस्थासोबत भागीदारी, मनुष्यबळ संसाधन विकास पद्धती, शाश्वात उपजीविकेचे स्तोत्र उभे करण्याकरिता अभियानामार्फत काम केले जाते. तसेच बचत गटाची स्थापना करून महिलांना कमीतकमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच व्यवसाय स्थापन करून रोजगाराची निर्मिती करणे हे या अभियानंतर्गत केले जाते. या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे.
बचत गटांच्या माध्यमातून रोजगार
ग्रामीण भागात अनेक महिला शेतीतील कामे करतात, त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्च आणि काही बचत करतात. बचत गटांमध्ये नव नोंदणी केलेल्या महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यातून सामूहिक व्यवसाय स्थापन करून महिलांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. अनेक महिला बचत गटांमधून कर्ज घेऊन आपला स्वतः चा व्यवसाय स्थापन करतात. दळण केंद्र, शेवळी मशीन, डाळ मिल, स्टेशनरी, किराणा दुकान आदी व्यवसाय सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.