Mahila Bachat Gat: अमरावती जिल्ह्यातील वाडेगाव येथील ‘क्रांती महिला बचत गट’ 2020 मध्ये स्थापन करण्यात आला. यातील काही महिलांनी बँकेत लोनसाठी अप्लाय केला होता. परंतु यांना लोन देण्यास बँकेकडून नकार देण्यात आला. त्याच काळात CRP म्हणून काम करणाऱ्या प्रीती बहुरूपी यांच्याशी ओळख झाली आणि महिला बचत गट स्थापन करून त्यातुन तुम्ही कर्ज घेऊ शकता ही माहिती मिळाली.
10 जानेवारी 2020 मध्ये CRP प्रीतीताई यांच्या माध्यमातून वरुड पंचायत समितीमध्ये उमेद संस्थेत ‘क्रांती महिला बचत गटाची’ नोंदणी केली. आता त्या बचत गटातील महिलांना पहिला RF 15000 त्याचबरोबर पहिले लोन 1 लाख रुपये आणि दुसरे लोन 3 लाख रुपये मिळाले आहे. या बचत गटाला 4 वर्ष पूर्ण झालेत. त्यातील काही महिलांनी पशू पालन, दुग्ध व्यवसाय, शेवळी मशीन असे व्यवसायही सुरू केले आहेत. तर जाणून घ्या बचत गट म्हणजे काय? त्याची स्थापना कशी केली जाते?
Table of contents [Show]
बचत गट म्हणजे काय?
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी येथील दीपिका आकोटकर यांच्याशी चर्चा करतांना त्या सांगतात की, बचत, कर्ज आणि गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन स्थापन केलेला गट म्हणजे बचत होय. पंचायत समिती अंतर्गत उमेद या संस्थेकडून बचत गट स्थापन केले जाते.
बचत गट स्थापन करण्यासाठी 3 संस्था आहेत. नाबार्ड, उमेद आणि माविम. या तीन पैकी एका संस्थेत नोंदणी करून महिला आपला बचत गट स्थापन करू शकतात. गावातील दहापेक्षा जास्त किंवा दहा महिला एकत्र येऊन त्यांच्या इच्छेनुसार बचत गट तयार करू शकतात. यात दशसूत्री आणि पंचसूत्रीचा वापर केला जातो.
यात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत असे दोन प्रकारचे गट असतात.
महिलांना एकत्र येऊन त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही एका संस्थेमध्ये नोंदणी करावी लागते. त्यासाठी सहभागी महिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, फोटो इत्यादि डॉक्युमेंट लागतात. बचत गटाचे नामकरणही करावे लागते. त्यांनंतर बँक अकाऊंट (bank account) ओपन करून महिलांना बचत ठरवून ती जमा करावी लागते. मीटिंग, पैसे जमा करण्याची तारीख ही दर महिन्याला एकच असायला पाहिजे. त्यात बदल झाल्यास बचत गटाचे क्रेडिट खराब होते. त्याचबरोबर दर महिन्याला झालेला व्यवहार लेखी असावा. या सर्व अटींचे पालन करून बचत गट चालवावा लागतो.
नोंदणीकृत बचत गट
नोंदणीकृत बचत गटांची नोंदणी ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका आधी स्वायत्त संस्थांनी नेमलेले अधिकारी नाबार्ड महिला आर्थिक विकास महामंडळासारखी मंडळी व अशासकीय संस्था येथे केली जाते. शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
अनोंदणीकृत बचत गट
या बचत गटांमध्ये सर्व बाबी आलेल्या बचतवर अवलंबून असतात. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. म्हणून बचत गट नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर काही बचत गट दारिद्रय रेषेखालील असतात तर काही APL मध्ये असतात. दारिद्रय रेषेखालील बचत गटांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत असतो.
बचत गटाचे फायदे
- दरमहा बचत होते.
- व्यवसाय स्थापन करण्यासाठी कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध होते.
- बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध होतो.
- तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमची बचत वापरायला घेऊ शकता.
- एकाच घरातील अधिक सदस्य बचत गटात सहभागी होऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (PAN card)
- बँक पासबुक (Bank Passbook)
- रेशन कार्ड (Ration Card)
बचत गट स्थापनेसाठी लागणारा खर्च
नोंदणीसाठी लागणारे रजिस्टर, पेन, स्टॅम्प, इंकपॉट, ठराव रजिस्टर, बँक अकाऊंट, तिकीट खर्च इत्यादि साठी सुरवातीला खर्च येतो. त्याकरिता 10 महिला असतील तर प्रत्येकी 100 रुपये जमा करून हा खर्च काढला जातो. यातील उरलेल्या पैशात वर्षभर लागतील तसे काही साहित्य आणले जाते.
बचत गटांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य अशी पदे असतात. सर्वानुमते यातील पदे महिलांना दिली जातात.
CRP काय आहे?
माविम, नाबार्ड आणि उमेद कडून प्रत्येक गावात एक CRP निवडला जातो. त्याच्याकडे आपल्या संस्थेची माहिती महिलांना पटवून सांगणे, ज्या महिला अजूनही बचत गटामध्ये नाही त्यांना माहिती देवून आर्थिक साक्षर बनवणे हे काम असते. महिलांना तयार करून त्यांच्या बचत गटाची नोंदणी करून देणे हे सुद्धा काम CRP करते.
बचत गटांच्या माध्यमातून केली जाणारी कामे
- महिलांना आर्थिक साक्षर बनविणे.
- आत्मनिर्भर बनविणे.
- कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे.
- व्यवसाय स्थापन करण्यास मदत करणे.
- विविध कार्यक्रम राबवून महिलांना जागरूक करणे.
बचत गटाची वैशिष्टे
बचत गट कर्जावर महिना 2% व्याज आकारणी करतात. पुण्यात हवेली तालुक्यातील श्रीरामनगर येथिल बचत गट महिन्याला 1% व्याज आकारतात. त्यांनी खताच्या ब्रिकेट बनवण्याचा कारखाना काढला आहे. वर्षाला ते 100 टन उत्पादन घेतात. दर महिन्याला बचत केल्याने तुमचेच पैसे तुम्ही वापरायला घेऊ शकता आणि परतफेडही करू शकता.