स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल सर्वात मोठा अडथळा ठरतो. मात्र, महाराष्ट्र सरकारद्वारे अशा अनेक योजना राबवल्या जातात, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करू शकता. उद्योजकांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी 2019 साली महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजना सुरू करण्यात आली.
राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे भांडवल असलेल्या उद्योगांना कर्ज उपलब्ध केले जाते. या योजनेंतर्गत कर्ज कसे मिळू शकते व कुठे अर्ज करता येईल? याबाबत जाणून घ्या.
Table of contents [Show]
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना काय आहे?
राज्य सरकारद्वारे 2019 मध्ये रोजगार निर्मितीच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 20 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंत भांडवल असलेल्या प्रकल्पांना कर्ज व अनुदान दिले जाते.
एकूण गुंतवणुकीत उद्योजकाचा वाटा हा 5 ते 10 टक्के, सरकारचे अनुदान 15 ते 35 टक्क्यांपर्यंत आणि बँकेकडून 60 ते 75 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते. सुरुवातीला अर्ज केल्यानंतर जिल्हा कार्यबल समितीकडून मंजूरी दिली जाते. त्यानंतर अर्ज सरकार बँक, खासगी बँक व सहकारी बँकेकडे पाठवला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकाला कर्जाची रक्कम उपलब्ध होते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- 18 ते 45 वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.
- वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट सुद्धा अर्ज करू शकतात.
- अर्जदाराने 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- तसेच, इतर केंद्र व सरकारी योजनांद्वारे अनुदानाचा फायदा घेतलेला नसावा. इतर योजनांचा लाभ घेतलेला असल्यास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत अनुदान मिळणार नाही.
- एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- जन्माचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतीचे लोकसंख्या प्रमाणपत्र
- प्रकल्प अहवाल
अर्ज कसा करू शकता?
तुम्ही https://maha-cmegp.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, नाव, शिक्षण, उद्योगाचा प्रकार, उत्पादित वस्तूची माहिती, प्रकल्पाचा खर्च व गुंतवणुकीसह इतर माहिती द्यावी लागेल. ज्या बँकेकडून कर्ज हवे आहे, त्या बँकेची निवड करण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय, अर्जासोबतच आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे अचूक असल्यास काही दिवसातच कर्ज मंजूर होईल.