केंद्र सरकारद्वारे रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एक योजना आहे. या योजनेंतर्गत उद्योगांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. याशिवाय, सरकारकडून उद्योगासाठी अनुदानही दिले जाते. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम नक्की काय? तुम्हाला या योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज कसे मिळेल? याविषयी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम काय आहे?
सरकारद्वारे वर्ष 2008 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली. हा एक क्रेडिट-लिंक्ड सबसीडी कार्यक्रम असून, याचा उद्देश ग्रामीण भागातील पारंपारिक उद्योगांना प्रोत्साहन देणे व बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.
ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्डाद्वारे राबवली जाते.
PMEGP अंतर्गत कोणत्या उद्योगांना मिळेल कर्ज?
PMEGP कोणतीही व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज करू शकते. ज्या उत्पादन यूनिटमधील गुंतवणूक 50 लाख रुपये आणि सेवा क्षेत्रातील उद्योगासाठीची गुंतवणूक 20 लाख रुपये आहे, ते उद्योजक या अंतर्गत कर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असायला हवे. तसेच, व्यक्तीचे कमीत कमी 8 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.
योजनेंतर्गत सरकारकडून एकूण गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. 5 टक्के गुंतवणूक अर्जदाराला स्वतः करावी लागेल व उर्वरित रक्कम कर्जद्वारे प्राप्त होईल. ही रक्कम बँकांकडून मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाच्या स्वरुपात दिली जाईल. कर्जावरील व्याजदर बँकेकडून ठरवला जाईल. तसेच, अनुदानाच्या रक्कमेसाठी 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असेल. म्हणजेच, तुम्हाला सुरुवातीला 3 वर्ष कर्जाचे हफ्ते भरावे लागतील. नियमितपणे हे हफ्ते भरल्यानंतर अनुदानाची रक्कम मिळेल.
कागदपत्रे –
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- प्रकल्प अहवाल
- विशेष श्रेणी प्रमाणपत्र
- ग्रामीण क्षेत्र प्रमाणपत्र
अर्ज कसा करू शकता?
तुम्ही https://www.kviconline.gov.in/ या वेबसाइटवरून कर्जासाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती द्यावी लागेल. नाव, मोबाइल नंबर आधार कार्ड व उद्योगाविषयीची इतर माहिती अर्जात नमूद करावी लागेल. तसेच, कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. अर्ज केल्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर मंजूर अथवा नामंजूर याविषयी माहिती मिळेल.