शार्क टॅंक चा दुसरा सिजन सुरू झालाय. शार्क टॅंक (Shark Tank) हा आगळावेगळा शो आहे. यात उद्योगधंद्यातील वेगवेगळ्या कल्पना घेऊन लोक येतात. या शोमधले परीक्षक देखील व्यावसायिक आहेत. त्यांना तुमच्या व्यवसायाची कल्पना आवडल्यास ते व्यवसायात गुंतवणूक देखील करतात. आतापर्यंत अनेक नव उद्योजकांना या शोने संधी दिली आहे.
अशातच शार्क टॅंकच्या शोमध्ये चर्चा रंगली ती पुरणपोळीची. पुरणपोळी न आवडणारे लोक विरळ असतील. प्रत्येकजण पुरणपोळी आवडीने खात असतो. कर्नाटकातील के. आर. भास्कर (K.R. Bhaskar) यांनी पुरणपोळीचा व्यवसाय सुरू केला. कर्नाटकात 'भास्कर पुरणपोळी घर' नावाने त्यांनी एक दुकान सुरू केलं. वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळी त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. लोकांनी देखील अल्पावधीत पुरणपोळी घराला पसंती दिली. आज कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी तब्बल 3.6 कोटींची कमाई केली आहे.
वेटर म्हणून केलं काम!
शार्क टॅंक मध्ये आपला आजवरचा प्रवास सांगताना के. आर. भास्कर म्हणाले की, वयाच्या 12 व्या वर्षी एका हॉटेलात त्यांनी वेटरचं काम केलं. लोकांना जेवण वाढणे, टेबल साफ करणे,भांडी साफ करणे अशी कामे केली. त्यानंतर एके ठिकाणी नृत्य प्रशिक्षक म्हणून देखील काम केलं. तसेच पान टपरी देखील चालवून बघितली. परंतु हॉटेलमध्ये काम करताना आपणही आपला हॉटेल व्यवसाय सुरू करावा असं डोक्यात होतं. वयाच्या 23 व्या वर्षी भास्कर यांनी सायकलवरून पुरणपोळी विकायला सुरुवात केली. लोकांना घरोघरी जाऊन ते पुरणपोळी खाऊ घालत होते. या व्यवसायाला लोकांनी पसंती दिली आणि व्यवसाय वाढत गेला. पुढे नशिबाने देखील साथ दिली आणि आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात 'पुरणपोळी घर' ही फूड चेन चालवून करोडो रुपयांची उलाढाल करत असल्याचे सांगताना भास्कर यांचा उर भरून आला होता.
एका कुकिंग शो ने दिला आत्मविश्वास
दरम्यान कर्नाटकात सायकलवर पुरणपोळी विकत असताना एका कुकिंग शो मध्ये भास्कर यांची निवड झाली. तिथे देखील त्यांच्या कौशल्याने त्यांनी लोकांची मने जिंकली. तिथे त्यांचा आत्मविश्वास बळकट होत गेला आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षात देखील आणला.
शार्कने दिला गुंतवणुकीस नकार
भास्कर यांचा व्यवसाय फायद्यात असून ते स्वतःच्या मेहनतीवरच उत्तम कामगिरी करत आहेत असे सांगून शोमधील परिक्षकांनी 'पुरणपोळी घर' या फूड चेनमध्ये गुंतवणुकीस नकार दिला आहे. असे असले तरीही भास्कर यांची ही प्रेरक कथा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.