टेलिव्हिजनवरील शार्क टॅंक इंडिया सीजन 2 हा व्यवसायासंदर्भातील रियालिटी शो (Reality Show) प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या शोमध्ये नवउदयोजक आपली आयडिया शार्कसमोर मांडतात आणि त्याबदल्यात गुंतवणूक मिळवतात. शार्क टॅंक इंडिया सीजन 2 मध्ये BharatPay चे संस्थापक अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) यांच्या बदली नवीन जज म्हणून Cardekho.com चे संस्थापक अमित जैन (Amit Jain) यांची हजेरी लागली आहे.
अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार सीजन 2 मधील सर्वाधिक श्रीमंत जजमध्ये अमित जैन पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची कमाई ही पियुष बन्सल, अमन गुप्ता, नमिता थापर, विनिता सिंह, अनुपम मित्तल यांच्यापेक्षा जास्त आहे. शार्क अमित जैन यांना त्यांच्या 'Cardekho' स्टार्ट-अपची कल्पना कुठून सुचली आणि ते कोट्यवधींचे मालक कसे झाले हे जाणून घ्या.
Table of contents [Show]
अमित जैन यांचा प्रवास
अमित जैन मूळचे राजस्थानमधील जयपूरचे. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण सेंट झेवियर्स सीनियर सेकंडरी स्कूल, जयपूरमधून पूर्ण केलं. लहानपणापासूनच कॉम्पुटरमध्ये विशेष आवड असलेल्या अमित यांनी B.Tech ही पदवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली येथून घेतली.
1999 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करायला सुरुवात केली. 1 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर ते तेथून बाहेर पडले आणि 2000 साली ट्रोलॉजीमध्ये (Trology) सामील झाले. या कंपनीत त्यांनी सलग 7 वर्ष वेगवेगळ्या पदांचा कार्यभार सांभाळला.
पहिलं स्टार्ट-अप - ‘गिरनार सॉफ्ट कंपनी’
सर्व काही ठीक चाललं असताना अचानक त्यांच्या वडिलांची तब्बेत बिघडली. वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते घरी परतले. सोबत भाऊ अनुरागही जयपूरला परत आला. वडिलांची काळजी घेण्यासोबत त्यांनी घराच्या गॅरेजमधून काम करायला सुरुवात केली. जिथे त्यांचं पहिलं स्टार्ट-अप सुरु झालं, ते होतं 'गिरनार सॉफ्ट कंपनी (Girnarsoft Company)'. ही एक आयटी सेवा व्यवस्थापन कंपनी होती.
पहिल्याच वर्षात कंपनी अतिशय नफ्यात आल्यामुळे टीमही 20 लोकांपर्यंत पोहचली आणि स्वतःचं ऑफिस घेण्याचं स्वप्नही अमित आणि अनुराग यांनी साकार केलं. पण 2009 मध्ये शेअर मार्केटमध्ये शेअर्स कोसळल्यामुळे कंपनी डबघाईला आली. त्यावेळी जवळपास 70 ते 80 लोक कंपनीत काम करत होते. त्यांचा पगार देणंही अमित यांना शक्य नव्हतं.
अशी सुचली Cardekho ची कल्पना
2008 साली दिल्ली ऑटो एक्स्पोला (Delhi Auto Expo) अमित आणि अनुराग यांनी भेट दिली होती. यावेळी त्याठिकाणच्या गाड्या पाहून अमित यांच्या मनात विचार आला की, लोकं सतत नवीन आणि जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करतात. मग आपण या संदर्भातील एखादा व्यवसाय का करू नये? या विचारातून जन्माला आली 'Cardekho' ची संकल्पना.
उभारलेला कारोभार कोसळत असताना Cardekho च्या संकल्पनेने उभारी दिली आणि पुन्हा जोमाने दोन्ही भाऊ कामाला लागले. भविष्यातील डिजिटलचे महत्त्व ओळखून Cardekho ला ऑनलाईन माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा निर्णय पक्का झाला आणि कंपनी सुरु झाली. हळूहळू कंपनीने जोर पकडला आणि प्रगतीच्या ट्रॅकवर गाडी धावू लागली. यश मिळतं गेलं आणि दोन्ही भावांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करायला सुरुवात केली.
2013 साली Sequoia Capital या अमेरिकन कंपनीने Cardekho ला फंडिंग दिलं. Cardekho च्या चढत्या आलेखामुळे कंपनीने अनेक इतर कंपन्यांना जाहिरातीसाठी आकर्षित केलं. दोन भावांनी घेतलेल्या मेहनतीमुळे 2014 मध्ये Gaddi.com आणि 2015 मध्ये Zigwheels या कंपन्या त्यांनी विकत घेतल्या.
ऑक्टोबर 2021 मध्ये सिरीज E फंडिंग फेरीत $250 दशलक्ष जमा केल्यानंतर Cardekho भारतातील युनिकॉर्न स्टार्टअप (Unicorn Startup) बनली आणि त्याचे मूल्य $1.2 अब्ज झालं. अशा रीतीने दोन भावांचं उद्योजक होण्याचं स्वप्न साकार झालं.
झीरो बजेट मार्केटिंग आणि 100% नफा
आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस कंपनीचे वार्षिक उत्पन्न 80 टक्क्यांनी वाढून 1600 करोडहून जास्त झाले. विशेष म्हणजे Cardekho च्या मार्केटिंगसाठी सध्या एकही रुपया खर्च केला जात नाहीये, तरीही भारताचे नंबर वन ऑटोटेक पोर्टल (Autotech Portal) आणि राजस्थानचे पहिले युनिकॉर्न स्टार्टअप म्हणून Cardekho ला ओळखलं जातंय.
आजच्या घडीला कंपनीकडे 35 दशलक्षाहून अधिक युनिक युजर्स महिन्याला भेट देतात. 6,000 हून जास्त जुन्या वापरलेल्या गाड्यांची विक्री आणि 3000 हून जास्त नवीन कारची विक्री महिन्याला केली जाते. Cardekho च्या वार्षिक नफ्यातून आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीतून शार्क अमित जैन आज $ 360 मिलियन म्हणजेच भारतीय चलनानुसार 2900 करोडचे मालक आहेत. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास प्रेरणा देणारा आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.