सोनी वाहिनीवरील शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा रियालिटी शो लोकांच्या चांगलाच पसंतीला उतराला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवउद्योजक आपल्या व्यवसायाची कल्पना शार्कसमोर मांडतात आणि गुंतवणूक मिळवतात. गेल्या वर्षी या कार्यक्रमाचा पहिला सीजन पार पडला, तर चालू वर्षात याचा दुसरा सीजन धुमाकूळ घालत आहे.
या दोन्ही सिजनमध्ये लेन्सकार्ट कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक पियुष बन्सल (Lenskart Co-Founder & CEO Piyush Bansal) यांनी अनेक नवउद्योजकांना प्रोत्साहन देवून अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. प्रिस्क्रिप्शन eyewear ऑप्टिशियन व्यवसायात नावलौकिक गाजवणारे उद्योजक पियुष बन्सल यांच्याबद्दल आज जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
शैक्षणिक वाटचाल
26 एप्रिल 1985 मध्ये नवी दिल्लीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात पियुष यांचा जन्म झाला. वडील बाल किशन बन्सल (Kishan Bansal) आणि आई किरण बंसल (Kiran Bansal) यांनी पियुष यांना नेहमीच नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पियुष यांचं प्राथमिक शिक्षण नवी दिल्लीतील डॉन बॉस्को हायस्कुलमध्ये (Don Bosco High School) पूर्ण झालं. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी त्यांनी कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये (McGill University) प्रवेश घेतला. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर पियुष भारतात परतले आणि त्यांनी बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (IIM) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
करिअरची सुरुवात
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पियुष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट (Microsoft Company) कंपनीमधून केली. तिथे ते प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्या ठिकाणी एक वर्ष काम केल्यानंतर पियुष भारतात परत आले. आपल्याला उद्योजक बनायचे आहे, असे त्यांनी सुरुवातीपासूनच मनाशी बाळगले होते. त्यानंतर त्यांनी लेन्सकार्ट व्हिजन फंड (Lenskart Vision Fund) आणि लेन्सकार्ट प्लस (Lenskart Plus) या कंपनीची स्थापना केली. या दोन्ही कंपन्या चष्मे आणि लेन्सशी संबंधित काम करतात.
आयआयएममध्ये (IIM) शिक्षण घेत असताना त्यांनी ‘Valyoo Technologies’ या कंपनीची स्थापना केली. ज्याच्या अंतर्गत ‘SearchMyCampus’ हे एक व्यावसायिक पोर्टल सुरु करण्यात आले. या पोर्टल अंतर्गत विद्यार्थ्यांना पार्ट टाईम जॉब, राहण्याची सुविधा, कार पुलिंग, इत्यादी सुविधा देण्यात येत होत्या. यामागचा हेतू हा विद्यार्थ्यांना मदत करण्याचा होता. हा स्टार्टअप काही काळ ठीक चालला. त्यानंतर पियुष यांनी अनेक स्टार्टअप सुरु केले, मात्र त्यांना त्यामध्ये फार यश मिळाले नाही.
लेन्सकार्टची सुरुवात
2010 मध्ये पियुष बन्सल,अमित चौधरी आणि सुमित कपाही यांनी मिळून लेन्सकार्ट या नावाने एक ऑनलाईन पोर्टल (Online Portal) सुरू केले. ज्यावर सुरुवातीला केवळ Lense विकल्या जात होत्या. काही काळानंतर त्यांनी Eyewear आणि Sunglasses ची विक्री करायला सुरुवात केली.
सुरुवातीला Lenskart ऑनलाईन वेब आणि App च्या माध्यमातून विक्री करत होतं. त्यानंतर त्यांनी फ्रेंचायजी पद्धत सुरू केली. कंपनीचा पसारा वाढताना पाहून Softbank ने सर्वात पहिली गुंतवणूक केली. ही फंडिंग 250 ते 300 मिलियन डॉलर्स पर्यंत होती. या गुंतवणुकीमुळे बाजारातील इतर कंपन्यांसोबत असलेली लेन्सकार्टची स्पर्धा संपुष्टात आली.
2019 मध्ये लेन्सकार्ट 1 बिलियन डॉलर कमवून युनिकॉर्न कंपनी झाले. सध्या या कंपनीत 5000 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. याशिवाय संपूर्ण भारतात 600 हून अधिक रिटेल स्टोअर (Retail Store) यशस्वी रित्या कार्यरत आहेत. भारतात उद्योगामध्ये पाय रोवल्यानंतर John Jocobs आणि Aqualens हे स्टार्टअप लेन्सकार्टने खरेदी केले आणि आजच्या घडीला लेन्सकार्ट हा एक नामांकित व लोकप्रिय ब्रँड आहे.
www.careerswave.in या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार लेन्सकार्टचे वार्षिक उत्पन्न 80 मिलियन डॉलर्स इतके आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास 600 कोटीहून अधिक आहे.
लेन्सकार्टची उत्पादने आणि सेवा
लेन्सकार्ट त्यांच्या ग्राहकांना 5000 हून अधिक चष्म्याच्या फ्रेम उपलब्ध करून देत आहे. याशिवाय 45 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या हाय क्वालिटी लेन्स पुरवल्या जात आहेत. इतर ब्रॅन्डच्या तुलनेत आपण काहीतरी वेगळं करावं यासाठी लोकांच्या घरी जाऊन लोकांना डोळे तपासणीची मोफत सुविधा आणि फ्रेम सिलेक्शनचा पर्याय लेन्सकार्टने देऊ केला. या सुविधेमुळे लोकांनी लेन्सकार्टला चक्क डोक्यावर उचलून घेतले. लेन्सकार्ट बाजारात येण्यापूर्वी लेन्स आणि फ्रेम यामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते. लोकांची हीच गरज लक्षात घेऊन लेन्सकार्टने स्वतःचा व्यवसाय उभारला आणि यशस्वीही केला. आज भारतातील एक अग्रगण्य ब्रँड म्हणून Lenskart ची ओळख आहे.
शार्क टँक इंडियाचा पहिला सीजन (Shark Tank India Season 1) मागच्या वर्षी पार पडला. यामध्ये अनेक नवउद्योजकांना गुंतवणूक मिळाली. पहिल्या सीजनमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या शार्कमध्ये अमन गुप्ताचा (Aman Gupta) नंबर लागतो. त्याने 9.4 करोड रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर पियुष बन्सल (Piyush Bansal) याने दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक गुंतवणूक केली होती. 8.3 करोड रुपयांची गुंतवणूक करून पियुषने नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले.