Mumbai Metro: पश्चिम उपनगरात होणाऱ्या ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेट्रो लाईन 2A आणि 7 सुरू करण्यात आली आहे. मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडली असून लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडली गेली आहे. यामुळे प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ वाचत असल्याने प्रवाशांची मेट्रोला सर्वाधिक पसंती मिळत आहे. आतापर्यंत या मार्गाने 1 लाख प्रवाशांचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून(MMRDA) देण्यात आली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
1 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला
मुंबई मेट्रो 2A आणि 7 चे शुक्रवारी(20 जानेवारी 2023) दुपारी 4 वाजता व्यावसायिक कामकाज सुरु होणार होते मात्र वेळापत्रकाच्या आधीच प्रवाशांसाठी हे गेट्स उघडण्यात आले. त्यानंतर तिकीट काउंटरवर प्रवाशांच्या रांगा पाहायला मिळू लागल्या तर काहींनी ऑनलाईन तिकीटास प्राधान्य दिले. मुंबई महानगर विकास प्रदेश प्राधिकरणने(MMRDA) ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनुसार मुंबईतील मेट्रोच्या प्रवासी संख्येने सलग दुसऱ्या दिवशी 1 लाखांचा टप्पा पार केला आहे. रात्री 8 वाजेपर्यंत 1,07,241 प्रवाशांनी मुंबई मेट्रो 2A आणि 7 वरून प्रवास केला आहे. दुसऱ्या टप्याचे लोकार्पण झाल्यानंतर सतत 3 दिवस मुंबईकरांचा मुंबई मेट्रो नेटवर्कच्या प्रवासाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(MMRDA) नुसार, विशाल भानुशाली आणि योगेश सोळंकी(Vishal Bhanushali and Yogesh Solanki) यांनी गुंदवली मेट्रो स्थानकातून प्रवासासाठी तिकीट खरेदी केले. श्री. सोळंकी म्हणाले की, मी मेट्रो मार्ग कार्यान्वित होण्याचीच वाट पाहत होतो. माझे ऑफिस मालाडला आहे. त्यासाठी मला बसमधून प्रवास करायला लागायचा. याकरिता 1 तासाहून जास्त वेळ लागत होता. मात्र ही मेट्रो सेवा सुरु झाल्याने हा वेळ खूपच कमी झाला आहे.
तर श्री भानुशाली म्हणाले की, मी शुक्रवारी सकाळी मेट्रो स्टेशनवर पोहोचलो होतो पण मला सांगण्यात आले की मेट्रो संध्याकाळी सुरू होईल. त्यानंतर मी कारमधून ऑफिसला रवाना झालो. घरी परतताना मी माझ्या ड्रायव्हरला मला गुंदवली मेट्रो स्टेशनवर सोडण्यास सांगितले. मी बाय रोड प्रवास करण्यापेक्षा मेट्रोने प्रवास करण्याला पसंती देईन.
MMRDA चे मेट्रोपॉलिटन कमिशनर एसव्हीआर श्रीनिवास(SVR Shrinivas) म्हणाले की, आतापर्यंत मेट्रो सेवा ही केवळ मुख्य लाईन्सच्या स्वरूपात मर्यादित होती. मात्र मेट्रो 2A आणि 7 च्या दोन लाईन मेट्रो 1 ला जोडल्या गेल्याने मुंबईला खऱ्या अर्थाने मेट्रोचे जाळे मिळाले आहे. यामुळे कित्येक प्रवाशांचा वेळ वाचत आहे.