Home buying increased: कोविड सारख्या महामारीमध्ये खऱ्या अर्थाने लोकांना घराचे महत्त्व पटले. याचाच परिणाम स्वरूप कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्यानंतर देशातील प्रमुख आठ शहरातील घरांच्या विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील 9 वर्षांमधील ही सर्वाधिक घरविक्री असल्याचे सांगण्यात येत आहे. नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालात ही बाब नमूद केली असून मुंबईमध्ये एका वर्षात 2022 मध्ये 85,169 फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचे सांगितले आहे. 2021च्या तुलनेत ही वाढ 35 टक्क्यांनी झाली आहे.
नाइट फ्रँक इंडियाचा अहवाल काय सांगतो?(Knight Frank India report)
नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया(Ghulam Zia, Senior Executive Director, Knight Frank India) यांनी सांगितले आहे की, ‘‘सातत्याने होणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील निवासी बाजारपेठेने 2022 मध्ये विक्रमी उच्चांक विक्री नोंदवली आहे. उत्पन्नाच्या पातळीत वाढ, घराच्या मालकीची गरज आणि घर खरेदीची तीव्र इच्छा शक्ती यासारख्या कारणांमुळे मुंबईतील बाजारपेठेत घरांची मोठ्या प्रमाणात विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे. गृहकर्जाच्या दरांमध्ये भलेही वाढ झाली असली तरीही याचा परिणाम मालमत्ता खरेदीवर(Property Buying) झालेला नाही. व्याजदरवाढ होऊन देखील घर खरेदी करण्याची क्षमता लोकांकडे असल्याचे दिसून आले आहे. गृहकर्ज दरांवर परिणाम होऊन रेपो दरांमध्ये आणखी काही वाढ होण्याची अपेक्षा असताना देखील मुंबई बाजारपेठेतील मागणी स्थिर राहू शकते अशी अपेक्षा त्यांनी या अहवालातून व्यक्त केली आहे. त्याशिवाय, 50 लाख आणि त्याखालील किंमतीच्या घर खरेदीत मंदी जाणवण्याची शक्यता असली तरीही या घरांच्या मागणीत वाढ होईल असेही त्यांचे म्हणणे आहे.
ऑफिस जागेच्या मागणीत वाढ(Increase in demand for office space)
2022 मध्ये कार्यालयीन वापराच्या जागेत वाढ झाली असल्याचे नाईटफ्रँकने(Knight frank) आपल्या अहवालात नमूद केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विभागात 2022 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये 3.4 दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्वावर देण्यात आली होती. तर 2021 मध्ये याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 59 टक्के इतकी होती. 2022 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये भाडेदरात वार्षिक तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मात्र मागील तीन तिमाहींमध्ये मुंबईमध्ये कार्यालयीन बाजारपेठेचे सरासरी भाडेस्थिर राहिले असल्याचे नाईटफ्रँकच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.