बँकेतील ठेवींवर तुम्हाला मिळणारे व्याज एका वर्षात 40000 रुपयांहून अधिक असल्यास बँक त्यावर टीडीएस वजा करते. मात्र तुमचे एकूण उत्पन्न करउत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल (Income Below Tax Limit) तर तुम्ही फॉर्म 15 G आणि फॉर्म 15 H बँकेत सादर करुन बँकेला टीडीएस वजा न करण्याची विनंती करु शकता.
आयकर सेक्शन 194 A नुसार बँकांकडून व्याजावरील उत्पन्नावर टीडीएस कापला जातो. सर्वसाधारण ग्राहकांसाठी वार्षिक 40000 रुपयांपेक्षा जास्त व्याज टीडीएस वजावटीसाठी पात्र ठरते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50000 रुपये इतकी आहे. मात्र जर तुम्ही करमुक्त उत्पन्नाच्या गटात असाल तर तुम्ही बँकेला टीडीएस कापू नये, यासाठी रितसर अर्ज करु शकतात. हा एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे.आयकर विभागाने यासाठी नियमावली तयार केली आहे. बँकेचा ग्राहक फॉर्म 15 G आणि फॉर्म 15 H सादर करु शकतो. मात्र अनिवासी भारतीय आणि कंपन्यांसाठी ही सुविधा नाही.
यातील फॉर्म 15 G हा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय नागरिक, एचयूएफ, ट्रस्ट आणि इतर करदात्यांसाठी आहे. त्यांचे एकूण उत्पन्न करमुक्त आहे. अशांना आयकर सेक्शन 194 A (1) आणि (1A) नुसार टीडीएस वजा करु नये म्हणून बँकेत 15 G चा फॉर्म भरता येईल. या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय 15G सोबत पॅनकार्ड देखील सादर करावे लागते.
फॉर्म 15 H हा 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यांचे एकूण उत्पन्न करमुक्त मर्यादेत असणे आवश्यक आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना आयकर सेक्शन 197 A नुसार टीडीएस वजा करु नये म्हणून बँकेत 15 H चा फॉर्म भरता येईल.दोन्ही फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे. तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन देखील हे फॉर्म भरता येतील.
15 G आणि फॉर्म 15 H कुठे लागू होतो
- कॉर्पोरेट बॉंडमधील उत्पन्नावर टीडीएस वजा केल्यास
- एलआयसी प्रिमीयम रिसिप्ट्स
- पोस्ट ऑफिस डिपॉझिटवर टीडीएस कापला असल्यास
- ईपीएफचे पैसे काढताना टीडीएस कापला असल्यास
- भाड्याची रक्कम वर्षाला 2.4 हून अधिक असल्यास
- विमा कमिशनवर टीडीएस कापला असल्यास