बरेच जण भविष्यातील गुंतवणूक म्हणून बचत खातं (Saving Account), फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit), रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) मध्ये पैसे ठेवणं सुरक्षित मानतात. पण या योजनांमध्ये पैसे ठेवताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण अशाप्रकारे गुंतवणूक केलेल्या पैशांवर जे व्याज मिळतं. त्यावर टॅक्स लागू होतो. कारण अशाप्रकारे बचत योजनांमधून गुंतवलेली रक्कम हे इतर स्तोत्रांमधून मिळणारं उत्पन्न मानलं जातं. म्हणून याबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.
आरडीतून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स!
फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवलेल्या पैशावर मर्यादेपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर ते बँकेकडून कापले जाते. रिकरिंग डिपॉझिटद्वारे येणाऱ्या व्याजावर बॅंक टीडीएस कापते. बॅंकेच्या भाषेत त्याला टीडीएस (TDS) म्हटले जाते. बॅंक अशा रकमेवर 10 टक्के टीडीएस आकारते आणि जर गुंतवणूकदाराने बॅंकेकडे पॅनकार्ड (Pan Card) जमा केले नसेल तर बॅंक अशा ग्राहकांच्या गुंतवणुकीवर 20 टक्के टीडीएस लावते. रिकरिंग डिपॉझिटमधून सर्वसाधारण ग्राहकांसाठी 40,000 रुपये, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएस लागू होत नाही. या मर्यादेपेक्षा अधिक व्याज मिळत असेल तर त्यातून टीडीएस वजा केला जातो. हा नियम एप्रिल 2019 पासून लागू झाला आहे.
टॅक्स सवलत कशी ठरवायची?
गुंतवणूक म्हणून बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांमधील बचत खात्यात ठेवलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज म्हणून 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर ती रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाते. तसेच संबंधित गुंतवणूकदाराचं उत्पन्न एखाद्या टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याला त्यानुसार टॅक्स लागू होतो. अशाचप्रकारे फिक्सड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिटमधून गुंतवण्यात येणाऱ्या रकमेच्या व्याजावर सरकारने मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा ओलांडली की, सरकारच्यावतीने बॅंक त्यातून टीडीएस वजा करते.
टीडीएस कापला जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेकडे फॉर्म 15H जमा करावा लागतो आणि सर्वसाधारण व्यक्तींना फॉर्म 15G जमा करावा लागतो. या फॉर्मद्वारे सदर व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न मर्यादित उत्पन्नापेक्षा जास्त नाही, हे सांगितले जाते. हा फॉर्म वर्षाच्या सुरूवातीलाच बॅंकेकडे भरून जमा केला असेल तर बॅंक टीडीएस कापत नाही. अन्यथा, बॅंक टीडीएस कापते आणि तो मिळवण्यासाठी संबधित ग्राहकाला रिटर्न फाईल (ITR Return File) करून टीडीएसचा परतावा मिळवावा लागतो.