भारतातील टॅक्स (कर) कायद्यांतर्गत, वैयक्तिक व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), कंपन्या, भागीदारी संस्था आणि सहकारी संस्था यांना वर्षातून एकदा त्यांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो. अर्थात, प्रत्येकसाठी टॅक्सचे वेगवेगळे स्लॅब (रचना) आहेत.
टॅक्स स्लॅब म्हणजे काय?
भारतामध्ये एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर ज्या दराने टॅक्स आकारला जातो. त्याला त्याचा टॅक्स स्लॅब म्हणून ओळखले जाते. दोन घटकांवर अवलंबून असलेल्या वैयक्तिक करदात्यासाठी टॅक्सचे वेगवेगळे स्लॅब लागू शकतात.
टॅक्स रचनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो, हे पण आपण पाहणार आहोत. भारतीय टॅक्स कायद्यानुसार, देशांतील नागरिकांवर आकारला जाणारा टॅक्स हा त्यांच्या उत्पन्नानुसार आणि वयानुसार बदलतो. समजा, आता तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक नसेल तर तुम्हाला भारतात टॅक्स लागणार नाही. नवीन टॅक्स रचनेनुसार 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न ट्रॅक्स फ्री आहे. पण जर तुम्ही कलम 80C अंतर्गत कपात करण्याचा पर्याय निवडत असाल तर तुम्हाला जुना कर स्लॅब लागू होईल.
टॅक्स दराच्या उद्देशाने भारतातील व्यक्तींना त्यांच्या वयानुसार 3 प्रकारांमध्ये विभागले आहे.
1. निवासी आणि अनिवासी भारतीय व्यक्ती ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा कमी
2. 60 ते 80 वयोगटातील भारतीय निवासी व्यक्ती
3. 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय व्यक्ती
टॅक्स रचनेबाबत बजेटमध्ये जोपर्यंत बदल केले जात नाहीत, तोपर्यंत मागील टॅक्स रचना तशीच सुरू राहते. यावेळी टॅक्सधारकांसाठी नवीन आणि जुनी अशा दोन्ही टॅक्स रचना सुरू ठेवल्या आहेत. आता आपण 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 60 वर्षांखालील वैयक्तिक व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबा(HUF)साठी लागू असलेली नवीन टॅक्स रचना पाहू.
नवीन टॅक्स रचना
वार्षिक उत्पन्न | टॅक्स दर |
5 लाखापर्यंत | टॅक्स नाही |
5 ते 7.5 लाखापर्यंत | 10 टक्के |
7.5 ते 10 लाखापर्यंत | 15 टक्के |
10 ते 12.5 लाखापर्यंत | 20 टक्के |
12.5 ते 15 लाखापर्यंत | 25 टक्के |
15 लाखांहून अधिक | 30 टक्के |
जुनी टॅक्स रचना
वार्षिक उत्पन्न | टॅक्स दर |
2.50 लाखापर्यंत | टॅक्स नाही |
2.50 ते 5 लाखापर्यंत | 5 टक्के |
5 ते 10 लाखापर्यंत | 12,500 रूपये + 20 टक्के |
10 लाख आणि त्यापेक्षा अधिक | 1,12,500 रूपये + 30 टक्के |
इन्कम टॅक्स कायदा, 1961 च्या कलम 87A मध्ये केलेल्या सुधारणेनुसार तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रूपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही 12,500 रूपयांची टॅक्स सवलत सूट मिळवण्यास पात्र असाल. यासोबतच टॅक्स लागलेल्या रकमेवर अतिरिक्त 4 टक्के आरोग्य व शिक्षण उपकर लावला जाईल.
ज्येष्ठ नागरिक (60 ते 80 वर्षे वय असलेले नागरिक)
वार्षिक उत्पन्न | टॅक्स दर |
3 लाखापर्यंत | टॅक्स नाही |
3 ते 5 लाखापर्यंत | 5 टक्के |
5 ते 10 लाखापर्यंत | 10,000 रूपये + 20 टक्के |
10 लाख आणि त्यापेक्षा अधिक | 1,10,000 रूपये + 30 टक्के |
यासोबतच टॅक्स लागलेल्या रकमेवर अतिरिक्त 4 टक्के आरोग्य व शिक्षण उपकर लावला जाईल.
ज्येष्ठ नागरिक (80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक)
वार्षिक उत्पन्न | टॅक्स दर |
5 लाखापर्यंत | टॅक्स नाही |
5 ते 10 लाखापर्यंत | 20 टक्के |
10 लाख आणि त्यापेक्षा अधिक | 1,00,000 रूपये + 30 टक्के |
वरीलप्रमाणे, या प्रकारातील ज्येष्ठ नागरिकांनाही टॅक्स लागलेल्या रकमेवर अतिरिक्त 4 टक्के आरोग्य व शिक्षण उपकर लावला जाईल.
50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करपात्र व्यक्तींसाठी अधिभार
करपात्र उत्पन्न | अधिभार |
ज्यांचे उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक आणि 1 कोटीच्या खाली | 10 टक्के |
ज्यांचे उत्पन्न 1 कोटीपेक्षा अधिक आणि 2 कोटीच्या खाली | 15 टक्के |
ज्यांचे उत्पन्न 2 कोटीपेक्षा अधिक आणि 5 कोटीच्या खाली | 25 टक्के |
ज्यांचे उत्पन्न 5 कोटी व त्यापेक्षा अधिक | 37 |
हा टॅक्स स्लॅब भारतातील वैयक्तिक व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी लागू आहे. देशांतर्गत कंपन्यांसाठीचा टॅक्स स्लॅब दर वेगळा आहे.
देशांतर्गत कंपन्यांसाठी टॅक्स स्लॅब
एकूण उलाढाल | टॅक्स दर |
400 कोटीपर्यंतच्या उलाढालीसाठी | 25 टक्के |
400 कोटींपेक्षा जास्त उलाढालीसाठी | 30 टक्के |
उपकर | 3 टक्के + अधिभार |
भारतातील टॅक्सबाबत लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे
भारतातील उत्पन्न मिळविणारा प्रत्येक नागरिक टॅक्स भरण्यास कायद्याने बांधिल आहे. इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स आकारण्यासाठी खालीलप्रमाणे 5 प्रकार निश्चित केले आहेत.
- पगार
- घराची मालमत्ता
- भांडवली नफा
- व्यापार आणि व्यवसाय
- उत्पन्नाचे इतर स्रोत ज्यात बचत ठेवी (FD), बचत खाते (Saving account), बक्षिसपात्र रक्कम इत्यादींचा समावेश येतो.
भांडवली नफा वगळता प्रत्येक उत्पन्नावर स्लॅबच्या दरानुसार टॅक्स आकारला जातो. मालमत्तेचे स्वरूप आणि मालमत्ता राखून ठेवलेल्या कालावधीच्या आधारे भांडवली नफ्यावर टॅक्स आकारला जातो. प्रत्येक भारतीयाने त्याला मिळणारी टॅक्स सवलत तपासली पाहिजे आणि त्यानुसार सवलत मिळवण्यासाठी दावा केला पाहिजे. प्रत्येक करपात्र व्यक्तीने 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरले पाहिजे. अनिवासी भारतीयांसाठी, भारतात जमा झालेले किंवा कमावलेले 2.5 लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न करपात्र आहे.