मार्च महिना म्हटलं की, लोक पगारावरील टॅक्स वाचवण्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावतात. जुनं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपेल आणि 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होईल. तुम्हीही योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अनेक पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात जुना पर्याय म्हणजे बँकेतील मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme).
या मुदत ठेव (FD) योजनेमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून टॅक्समध्ये सवलतही मिळवू शकता. सध्या RBI ने रेपो दरात 250 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा 6.50 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. साहजिकच वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्याचप्रमाणे मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली. तर आज आपण अशाच 5 बँकांच्या मुदत ठेव योजनांबद्दल माहिती करून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला जास्त व्याजदर मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला 31 मार्चपूर्वी या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. कोणत्या आहेत या मुदत ठेव योजना, चला जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
एसबीआय बँक मुदत ठेव योजना (SBI FD)
स्टेस्ट बँक ऑफ इंडियाने 15 फेब्रुवारी 2023 पासून ‘एसबीआय अमृत कलश योजना’ (SBI Amrut Kalash Fixed Deposit Scheme) सुरू केली. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक पैसे गुंतवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा असून यामध्ये उच्च व्याजदर देण्यात येतोय. ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेत 7.60 टक्के व्याजदर, तर सामान्य नागरिकांसाठी 7.10 टक्के व्याजदर दिला जात आहे.
याशिवाय एसबीआय बँकेची वी केअर मुदत ठेव योजना (We Care Fixed Deposit Scheme) देखील गुंतवणुकीसाठी सर्वात चांगली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 ते 10 वर्षासाठी 7.5 टक्क्यांचा व्याजदर देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला 31 मार्चपूर्वी या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.
पंजाब ॲण्ड सिंध बँक मुदत ठेव योजना (Punjab & Sind Bank FD)
पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 4 विशेष मुदत ठेव योजना जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत ग्राहकांना 31 मार्च पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. बँकेने पीएसबी फॅब्युलस (PSB Fabulous), पीएसबी फॅब्युलस प्लस (PSB Fabulous Plus), पीएसबी ई ॲडव्हान्टेज (PSB E Advantage) आणि पीएसबी उत्कर्ष (PSB Utkarsh) या चार मुदत ठेव योजना जाहीर केल्या आहेत.
पीएसबी फॅब्युलस (PSB Fabulous) मुदत ठेव योजनेचा कार्यकाळ 300 दिवसांचा आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना एका वर्षासाठी 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. याशिवाय जेष्ठ नागरिकांना 300 दिवसांसाठी 8 टक्के आणि 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना 8.35 टक्के व्याज दिले जात आहे.
पीएसबी फॅब्युलस प्लस (PSB Fabulous Plus) मुदत ठेव योजनेचा कार्यकाळ हा 601 दिवसांचा आहे. या अंतर्गत सामान्य नागरिकांना 7 टक्के व्याजदर दिला जात आहे. याशिवाय जेष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के आणि 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना 7.85 टक्के व्याजदर दिले जात आहे.
पीएसबी ई ऍडव्हान्टेज (PSB E Advantage) मुदत ठेव योजना ही 601 दिवसांसाठी असून ही सेवा डिजिटल स्वरूपात पुरवली जाते. या अंतर्गत सामान्य लोकांना 7 टक्के व्याजदर दिला जात आहे, तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के आणि 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना 7.85 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
पीएसबी उत्कर्ष (PSB Utkarsh) मुदत ठेव योजनेचा कालावधी 222 दिवसांचा असून या अंतर्गत सामान्य नागरिकांना 7.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के आणि 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना 8.60 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
इंडियन बँक मुदत ठेव योजना (Indian Bank FD)
इंडियन बँकेने 19 डिसेंबर 2022 पासून आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन मुदत ठेव योजना आणली आहे. ‘इंडियन शक्ती 555’ (Ind Shakti 555) या नावाने ही मुदत ठेव योजना ओळखली जात आहे. या योजनेचा कालावधी 555 दिवसांचा असून यामध्ये सामान्य नागरिकांना 7 टक्के व्याजदर, तर जेष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देण्यात येतोय. साधारण 5 हजार रुपयांपासून ते 2 कोटीपेक्षा कमी रकमेची गुंतवणूक तुम्ही यामध्ये करू शकणार आहेत.
एचडीएफसी बँक मुदत ठेव योजना (HDFC Bank FD)
भारतातील नामांकित बँक एचडीएफसीने जेष्ठ नागरिकांसाठी ‘सिनिअर सिटीझन केअर मुदत ठेव योजना’ (Senior Citizen Care Fixed Deposit Scheme) सुरु केलेली आहे. ही योजना बँकेने 18 मे 2020 पासून सुरु केली असून याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत असणार आहे. या योजनेत जेष्ठ नागरिकांना 7.75 टक्क्यांचे व्याजदर दिले आहे. महत्त्वाचं म्हणजे सामान्य मुदत ठेवीपेक्षा या योजनेच्या मुदत ठेवीमध्ये 0.75 टक्क्यांचे जास्त व्याजदर मिळणार आहे. या मुदत ठेवींचा कालावधी हा 5 वर्ष ते 10 वर्ष असा आहे.
आयडीबीआय बँक मुदत ठेव योजना (IDBI Bank FD)
आयडीबीआय बँकेने 20 एप्रिल 2022 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नमन ज्येष्ठ नागरिक योजना’ (Naman Senior Citizen Scheme) सुरु केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना 1 वर्षापेक्षा जास्त ते 10 वर्षापर्यंत पैसे गुंतवता येणार आहे. या योजनेत किमान 10 हजारांपासून ते 2 कोटींपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्क्यांचे जास्त व्याजदर दिले जात आहे. त्यामुळे हा देखील गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय म्हणून पाहता येऊ शकतो.
आरबीआयने वाढवलेल्या रेपो दरामुळे सर्व प्रकारची कर्जे महागली आहेत. पण त्याचबरोबर बॅंकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात ही वाढ केली. या योजनांचा लाभ घेऊन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.