Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Investment FDI : 2023मध्ये ‘या’ क्षेत्रात होणार 10 अब्ज अमेरिकन डॉलरची ($ 10 Bill) गुंतवणूक 

Green Fuel

भारतात पुढच्या वर्षी 2023 मध्ये भारतात ‘या’ क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक होईल असा अंदाज बँक ऑफ अमेरिकेनं वर्तवला आहे. इतकंच नाही तर विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत सगळ्यात पुढे असेल असंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.

जगभरात सगळ्याच देशांनी हरित ऊर्जा (Green Energy), हरित हायड्रोजन (Green Hydrogen) आणि एकूणच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर (Renewable Energy) या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये हरित इंधन (Green Fuel), इलेक्ट्रिक वाहनं (EVs) यांची बाजारपेठ विस्तारत जाणार आहे .    

आणि या उद्योगांच्या निर्मितीत भारतही जगाच्या बरोबरीने असेल असं सांगणारा बँक ऑफ अमेरिकेचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, 2023मध्ये हरित ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतात तब्बल 10 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होईल. बँकेचे भारतातील प्रमुख कुकू नखाते यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे. म्हणूनच बँक ऑफ अमेरिकेलाही (Bank of America) भारतात विस्तार करायचा आहे.    

बँक ऑफ अमेरिकेतर्फे अलीकडे उत्तर अमेरिकेत एक रोड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हरित इंधन आणि हरित वायू या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना एकत्र आणण्यात आलं. या सर्वांमध्ये असे प्रकल्प उभारण्यासाठी भारत हे योग्य ठिकाण असल्याचं काही उद्योजकांनी बोलून दाखवलं, असं बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.    

भारतातील लोकशाही, राजकीय स्थिरता, कोव्हिडशी दिलेला यशस्वी लढा यामुळे उद्योगाला लागणाऱ्या जागेबरोबरच तिथे पुरवठा साखळी उभी करायलाही चांगली संधी आहे, असं बँक ऑफ अमेरिकेनं म्हटलं आहे.    

बँक ऑफ अमेरिकेचा भारतात विस्तार BoA Wants to Expand in India  

येणाऱ्या वर्षांमध्ये बँक ऑफ अमेरिकेला भारतातही विस्तार करायचा आहे. आणि त्यासाठी काही प्रमाणात नोकर भरतीही केली जाणार आहे. दुसरं म्हणजे, सध्या कर्जबाजारी असलेल्या ऊर्जा कंपन्यांना आर्थिक मदत देऊन सावरण्याची संधी देणं हे काम त्यांना आधी करायचं आहे.   

 अर्थात, सध्या बँकेला विस्ताराच्या बाबतीत आस्ते कदम चालायचं आहे. आणि भारतीय बाजाराबद्दल बोलतानाही तोच दृष्टिकोण अहवालात जाणवतो.     

त्यांच्यामते, भारतातली गुंतवणूक लगेच नाही तर हळू हळू आणि वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सुरू होईल. कारण, आता बाजारात उलाढाल सुरू असली तरी अर्थव्यवस्थेला खरा वेग 2023च्या तिमाहीतच येईल. यासाठी बँकेनं शेअर बाजाराचं उदाहरण दिलं. इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार चांगली कामगिरी करत आहेत. आणि बाजारात आयपीओ (IPO) येण्याचं प्रमाणही जास्त आहे. पण, 1 अब्ज आकाराच्या मोठ्या आयपीओसाठी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीची वाट पाहावी लागणार आहे. तसंच ऊर्जा क्षेत्राचं आहे.    

मोठी गुंतवणूक वर्षाच्या अखेर आणि नवीन वर्षीच सुरू होईल असं बँकेला वाटतंय.