पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी रेनमॅटर फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या निधी संकलनाच्या प्रयत्नांना भारतातल्या नवश्रीमंत वर्गाने आर्थिक वर्ष 2022-23मध्ये चांगला हातभार लावला आहे. तब्बल 193 कोटी रुपयांचा निधी त्यामुळे जमा झाला आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत या निधीत थेट 46% वाढ बघायला मिळाली आहे. 2070 सालापर्यंत भारताला कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्यावर आणायचं आहे. आणि हे उद्दिष्टं साध्य करायचं असेल तर त्यासाठी तब्बल 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका निधी लागणार आहे. हे काम एकट्या सरकारवर पडू नये यासाठी मागच्या दोन वर्षांत देशात अनेक सेवाभावी संस्था उभ्या राहिल्या आहेत.
त्यातलीच एक आहे रेनमॅटर फाऊंडेशन. कर्नाटकमधील ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कंपनी झिरोदाचे मालक नितिन कामथ यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. हे संस्थेचं दुसरंच वर्ष आहे. आणि आतापर्यंत संस्थेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांनी 20 राज्यांमधून देणगीदार जोडले आहेत.
जागतिक स्तरावर पूर्वीपासूनच पर्यावरणासाठी निधी संकलनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आणि यामध्ये आघाजीवर आहे बेझोस अर्थ फंड. अॅमेझॉन कंपनीचे मालक असलेले जेफ बेझोस यांनी हे फाऊंडेशन स्थापन केलं असून पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी 10 अब्ज अमेरिकन डॉलर उभे करण्याचं वचन त्यांनी दिलं आहे.
तर न्यूयॉर्कमधल्या रॉकफेलर फाऊंडेशनने जून 2022मध्ये या कामासाठी 5 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करण्याची तयारी दाखवली आहे.
अॅपल या स्मार्टफोन कंपनीचे संस्थापक स्टिव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल यांनीही एकूण जमा झालेल्या पैशांपैकी 2% वाटा उचलला आहे. जागतिक स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी देणगी देणं हे आता नित्याचं आहे.
पण, भारतात या गोष्टीला अलीकडे सुरूवात झाली आहे. भारतातले आघाडीचे देणगीदार आहेत रतन टाटा, रोहिणी निलकेणी, आनंद महिंद्रा, महेश शाह यांचा समावेश आहे. भारताने COP27 परिषदेत देशातलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याबद्दल कटीबद्धता दाखवली आहे. आणि आताचे सगळे प्रयत्न त्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणं, कोळसा जाळून वीज मिळवण्यापेक्षा हरित इंधनातून ऊर्जा मिळवणारे स्त्रोत विकसित करणं, इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करणं, या दिशेनं सुरू आहेत.
निधी संकलनातला बराचसा हिस्सा त्यासाठीच खर्च व्हायचा आहे.