इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरत असून गुंतवणूकदारही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत. मात्र, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये देशात जी काही क्रांती होत आहे तिचे फळ भारताला २०३० नंतर मिळू शकेल, असे ACKO आणि YouGov India यांनी केलेल्या सर्व्हेतून समोर आले आहे. २०३० सालापर्यंत पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा जास्त उत्पादन इलेक्ट्रिक वाहनांचे होईल, असे ६६% सर्व्हेत सहभागी झालेल्या नागरिकांनी म्हटले आहे.
पायाभूत सुविधांची कमतरता ठरतेय अडथळा
इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यामधील गुंतवणूक फायद्याची असल्याचे सर्व्हेत सहभागी झालेल्या ५७ टक्के नागरिकांनी म्हटले. तर पर्यावरणासाठी फायदेशीर असल्याचे म्हणत ५६ टक्के नागरिकांनी EV कार घेण्याची इच्छा व्यक्त केली. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी देशात पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणेची गरज असल्याचे ६० टक्के नागरिकांनी म्हटले. सध्या पायाभूत सुविधा कमी असल्या तरी २०३० सालापर्यंत भारतात सर्व सुविधा उपलब्ध होतील, असे ८९ टक्के नागरिकांनी म्हटले. इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसारासाठी आणि त्यांचा देशभरात वापर होण्यातील मुख्य अडथळा म्हणजे अपुऱ्या पायाभूत सुविधा हे मुख्य कारण असल्याचे वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे.
EV मुळे वाहन खर्चात बचत
अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली वाहने खरेदी करण्यास ५७ टक्के नागरिक इच्छुक आहेत. तर ६२ टक्के नागरिकांना वाढत्या इंधन दराबाबत चिंता वाटते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे वाहन वापरण्याच्या खर्चात बचत होत असल्याचे ४८ टक्के नागरिकांनी म्हटले. ४८ टक्के नागरिकांनी EV वाहने पारंपरिक वाहनांपेक्षा किफायतशीर असल्याचे म्हटले आहे.इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वाळूचा वापर सहज सोप्या पद्धतीने केला जातो हे ६३ टक्के नागरिकांना माहिती नसल्याचे पुढे आले आहे. EV मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीचे आयुष्य फक्त २ ते ५ वर्षच असल्याचा समज ६६ टक्के नागरिकांचा होता. बॅटरी किती वेळा आणि कशाप्रकारे चार्ज करता याचा बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, हे १० पैकी ८ नागरिकांना माहिती असल्याचेही सर्व्हेतून पुढे आले.
इलेक्ट्रिक वाहनांबाबत जनजागृतीची गरज
इलेक्ट्रीक वाहनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची अत्यंत गरज असल्याचे या सर्व्हेतून प्रकर्षाने जाणवले. EV पॅसेंजर वाहनांसोबतच इतर प्रकारचे सर्व इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दरवर्षी तब्बल १८५ टक्क्यांनी वाढत असल्याचे ऑटोमोबाईल डीलर संघाच्या FADA या संस्थेने म्हटले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ३९ हजार ३२९ EV वाहनांची विक्री झाली होती. या सर्व्हेसाठी २८ ते ४० वयोगटातील सुमारे एक हजार नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले. यातील अनेक जणांकडे आधीपासूनच EV वाहन होते किंवा ते घेण्याच्या विचारात होते.